आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाघाने केली शिकार:तेंदुपत्ता संकलनाला गेलेल्या वृद्धाची वाघाने केली शिकार

चंद्रपूर20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तेंदुपत्ता संकलनाला गेलेल्या वृद्धाला वाघाने ठार मारल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. ब्रम्हपुरी वन विभागांतर्गत, नागभीड वनपरिक्षेत्रात येणाऱ्या कोसंबी- गवळी बिटातील कक्ष क्रमांक ७४२ मध्ये तेंदुपत्ता संकलनाकरिता गेलेला नवेगाव हुंडेश्वरी येथील आडकू गेडाम (६५) याला वाघाने ठार मारले. याबाबतची माहिती मिळताच वनरक्षक के. पाटील यांनी घटनास्थळी भेट घेऊन मौका पंचनामा करून शवविच्छेदना करिता ग्रामीण रुग्णालय येथे पाठवण्यात आले.

या प्रकणातील पीडित परिवाराला वन विभागामार्फत तत्काळ आर्थिक मदत करण्यात आली. यावेळी सहाय्यक उपवनसंरक्षक के. आर. धोंडणे, वन परिक्षेत्र अधिकारी महेश गायकवाड, वनरक्षक के. पाटील, क्षेत्र सहाय्यक सय्यद, देवपायलीचे वनरक्षक येडमे उपस्थित होते. घटनास्थळी कॅमेरे लावून वाघाच्या हालचालीवर नजर ठेवण्यात येत असून वनविभागाने या परिसरात गस्त सुरू केलेली आहे. हा भाग वनविभागाच्या ब्रह्मपुरी उपविभागात मोडतो. या भागात ८५ ते ९० वाघ असल्याचे सांगितले जाते. नुकताच तेंदुपत्ता सीझन सुरू झाला असून तेंदूपत्ता संकलनासाठी माणसे जंगलात जातात. अशावेळी दुर्घटना घडतात. तेंदूपत्ता काढण्यासाठी सूर्योदयानंतर जंगलात समूहाने जावे. तेंदूपत्ता काढताना काही मजुरांनी उभे राहून इतर मजुरांची निगराणी करावी, अशा सूचना वनविभागाने दिल्या आहेत. वाघांचा, बिबट्यांचा बंदोबस्त करा ः खा.अशोक नेते

चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत पट्टेदार वाघ आणि बिबट्यांचा मोठा वावर आहे. वाघ आणि बिबट्यांच्या हल्ल्यात मनवी जीव आणि पाळीव प्राणी मारले जात आहेत. त्यामुळे बिबट आणि वाघांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी सूचना खा.अशोक नेते यांनी वनविभागाला केली आहे.

वाघाच्या वावराच्या वेळी तेंदूपत्ता काढण्याचे काम टाळा
सध्या उष्णतेच्या तडाख्यामुळे तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात मजूर भल्या पहाटे जात आहेत. याच काळात वाघांचा वावर असतो. तेंदूपत्ता काढताना जमिनीवर खाली बसून काम करावे लागते. तृणभक्षक प्राणी समजून कित्येकदा वाघ माणसांवर हल्ला करतात. त्यामुळे तेंदूपत्ता काढण्यासाठी जंगलात समूहाने जाणे आवश्यक ठरते. भल्या पहाटे वाघाच्या वावराच्या वेळीस तेंदूपत्ता काढण्याचे काम टाळावे. बंडू धोतरे, सदस्य, राज्य वन्यजीव सल्लागार मंडळ.

बातम्या आणखी आहेत...