आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:मास्कसाठी सरकारी यंत्रणेच्या मदतीला आनंदवन प्रकल्प; दहा हजार मास्क मोफतच पुरवणार

नागपूर3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • चाळीस हजार मास्कची मागणी, एक लाख तरी तयार करावे लागणार

रमाकांत दाणी

कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग थोपवण्यासाठी सरकारी यंत्रणांना मास्कचा तुटवडा जाणवत असताना कुष्ठरुग्णांचा आधार ठरलेला आनंदवन प्रकल्प सरकारी यंत्रणांच्या मदतीला धावून आला आहे. आनंदवनमध्ये सध्या हजारोंच्या संख्येने मास्कची निर्मिती होत असून आतापर्यंत चाळीस हजारांवर मास्कची मागणी सरकारी यंत्रणांसह विविध घटकांकडून नोंदवली गेली आहे. येत्या काही दिवसांत मागणीचा आकडा एक लाखापर्यंत जाऊ शकतो, अशी शक्यता आता आनंदवनच्या महारोगी सेवा समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. 

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आनंदवन प्रकल्पात तयार होणाऱ्या सुती कापडापासून तीनपदरी मास्कची निर्मिती होत आहे. या मास्कचा दर्जा अतिशय उत्तम असून ते धुऊन पुन्हा वापरता येते. सर्वत्र मास्कचा तुटवडा जाणवत असताना सुरुवातीला आनंदवननिर्मित दहा हजार मास्क सरकारी यंत्रणेला डोनेट करण्याची महारोगी सेवा समितीची योजना होती. त्यानुसार साडेतीन हजारांवर मास्क यापूर्वीच सरकारी यंत्रणेला पुरवण्यातही आले. मात्र, आता मास्कची मागणी प्रचंड वाढली आहे. अनेक राजकीय नेत्यांनी त्यांच्या मतदारसंघात वितरित करण्यासाठी मास्क तयार करून देण्याची विनंती आनंदवनला केली आहे. 
महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल आमटे यांनी सांगितले की, ‘आमची क्षमता दहा हजार मास्क मोफत पुरवण्याची आहे. सध्या चाळीस हजारांवर मास्कची ऑर्डर आली आहे. चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ जिल्हा प्रशासनाकडूनही ऑर्डर आहेत. त्यासाठी आम्हाला दानदातेच शोधावे लागत आहेत. ते मिळाल्यास सरकारी यंत्रणांना तेवढे मास्क मोफत पुरवणे आम्हाला शक्य होणार आहे. आगामी काळात एक लाख मास्क तरी आम्हाला तयार करावे लागतील असे दिसते.’

सध्या आनंदवनातील दिव्यांग टेलर्सकडून मास्कची निर्मिती होत आहे. मात्र, आता उद्यापासून अनेक बचट गटही मास्क निर्मितीच्या कामाला लागणार असल्याचे शीतल आमटे यांनी सांगितले. या मास्कसोबतच एक पाऊचदेखील पुरवले जात आहे. निर्जंतुक आणि निर्जंतुक न केलेले मास्क वेगवेगळे ठेवण्यासाठी पाऊच अतिशय उपयोगी पडत असल्याचा अनुभव येत आहे. 

दरम्यान, ग्रामीण भागात सर्वसामान्य लोकांसाठी मास्कची गरज पुरवणे शक्य नसल्याने आनंदवन प्रकल्पाने गोधडी अथवा साड्यांपासूनही मास्क तयार करण्याचे व्हिडिओ तयार केले आहेत. कापडाची दुकाने बंद असल्याने घरोघरी आढळणाऱ्या गोधड्यांपासून मास्क तयार करण्याची पद्धत लोकांना सांगितली जात आहे. 

कोरोना वॉरियर्स मुले

कोरोनाचे संकट मोठे आहे. आनंदवन प्रकल्पात सध्या अडीच हजारांवर लोक राहतात. प्रकल्पात कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यास काय करायचे, परिस्थिती कशी हाताळायची, याचे प्रशिक्षण आनंदवनातील मुलांनाही देण्यात येत आहे. आम्ही कोरोना वॉरियर्सची एक टीमच तयार करत आहोत, असे शीतल आमटे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...