आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या ताफ्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी साेमवारी भंडारा येथील विश्रामगृहावर झोडलेल्या चिकन, मटण पार्टीचे बुधवारी राज्यभरात संतप्त पडसाद उमटले. जिल्हा रुग्णालयात ८ जानेवारीच्या मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत दहा बाळांचे जीव गेले होते. संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणाऱ्या या घटनेनंतर मंत्र्यांच्या ताफ्यातील कर्मचाऱ्यांनी भंडारा भेटीच्या निमित्ताने रात्री पार्टी केल्याबद्दल हा असंवेदनशीलतेचा कळस असल्याची संतप्त प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही व्यक्त केली. मात्र हे प्रकरण अंगलट येण्याची चिन्हे दिसताच या प्रकरणाशी आमचा संबंध नाही असे सांगून भंडाऱ्यातील प्रशासकीय
अधिकाऱ्यांनी आता हात झटकले आहेत.
‘मृत्यूच्या दारात निर्लज्जांचा भंडारा’ या मथळ्याखाली मंत्र्याच्या ताफ्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पार्टीचा पर्दाफाश ‘दिव्य मराठी’ने बुधवार, दि.१३ च्या अंकात केला होता. हे वृत्त प्रसिध्द होताच राज्यभरात संतापाची लाट उसळली. मात्र भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी या प्रकरणी विचारताच ‘नो काॅमेंटस’ म्हणून त्यांनी भाष्य करणे टाळले. तर आम्ही ‘मिक्स व्हेज, वांग्याचे भरीत, दाल तडका, भात, भाकरी आणि पोळ्या’, असे जेवण बनवायला सांगितले होते असे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी मनीषा कुरसुंगे यांनी स्पष्ट केले. मग, मटन, चिकन आणि झिंगे आणले कोणी असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहे.
याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता बी. एन. नंदनवार यांनीही आमचा या प्रकरणाशी थेट संबंध नाही. आम्हाला यात उगाच गाेवू नका, असे सांगून हात वर केले. ते म्हणाले, बांधकाम विभागाच्या अखत्यारित शासकीय विश्रामगृह येत असले तरी इथे आम्ही अभ्यागतांना कक्ष किंवा खोल्या उपलब्ध करून देतो. मंत्री यशोमती ठाकूर यांच्या दौऱ्याप्रसंगी भोजनाची व्यवस्था कुणी केली याची कल्पना नाही, असे नंदनवार म्हणाले.
शिवसेनेच्या वतीने एक लाखाची मदत :
राज्याचे नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांनीही बुधवारी रुग्णालयाला भेट देवून पाहणी केली. या अपघातात दगावलेल्या शिशूच्या पालकांना शिवसेनेच्या वतीने एक लाख रूपये देण्याची घोषणा केली.
अधिकाऱ्यांची विश्रामगृहावरील मेजवानी असंवेदनशीलतेचा कळस, दाेषींवर कारवाई झाली पाहिजे : देवेंद्र फडणवीस
भंडारा दुर्घटनेच्या पाहणीसाठी आलेले देवेंद्र फडणवीस यांनी “दिव्य मराठी’त प्रसिद्ध झालेली बातमी वाचून या प्रकरणात दोषी ठरलेल्यांवर कठोर कारवाई व्हायला हवी, अशी भावना व्यक्त केली.
भंडारा दुर्घटनेच्या पाहणीसाठी आलेल्या मंत्र्यांच्या ताफ्यातील कर्मचाऱ्यांची विश्रामगृहावरील मेजवानी म्हणजे असंवेदनशीलतेचा कळस असल्याची संतप्त प्रतिक्रिया विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. फडणवीस बुधवारी नाशिक दौऱ्यावर होते. ‘दिव्य मराठी’तील बातमी वाचून त्यांनी दाेषी असलेल्यांवर तातडीने कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी केली.
राज्यपालांची भेट, मृतांच्या कुटुंबीयांना २ लाखांची मदत
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बुधवारी भंडाऱ्यातील जिल्हा रुग्णालयास भेट दिली. दहा चिमुकल्यांचा मृत्यू अत्यंत क्लेशदायक असून अशा प्रकारच्या घटना भविष्यात घडू नयेत, यासाठी खबरदारीच्या उपाययोजना तत्काळ लागू कराव्यात, असे निर्देश राज्यपालांनी प्रशासनाला दिले. या वेळी त्यांनी मृत बालकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली. सकाळी १०.०५ वाजता राज्यपाल रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी रुग्णालयाची तसेच दुर्घटनाग्रस्त शिशू केअर युनिटची पाहणी केली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.