आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नक्षलींविरुद्ध मोठी कारवाई:सह्याद्री उर्फ मिलिंद तेलतुंबडेसह 26 नक्षलवादी ठार झाल्याची शक्यता; ओळख पटविण्याची प्रक्रिया सुरू, C-60 चे 5 जवान जखमी

हेमंत डोरलीकर | गडचिरोली16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोलिस आणि C-60 पथकाने शनिवारी मोठी नक्षलवाद विरोधी कारवाई केली. यामध्ये नक्षलवाद्यांचा महाराष्ट्र सचिव सह्याद्री उर्फ मिलिंद तेलतुंबडे ठार झाल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. परंतु, याबाबत अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. एकूणच 26 नक्षली ठार झाल्याचे सूत्रांकडून समजते. महाराष्ट्र आणि छत्तीसगड सीमेवर पार पडलेल्या या कारवाईमध्ये 5 जवान सुद्धा जखमी झाले. त्यांना उपचारासाठी नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ओळख पटविण्याचे काम सुरू
ठार झालेले नक्षलवादी नेमके कोण आहेत त्यांची ओळख पटविण्यासाठी सर्व मृतदेह जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आले आहेत. यातील एक मृतदेह सह्याद्रीचा असू शकतो. यांची ओळख पटविण्यासाठी तज्ज्ञ पोलिसांसह आत्मसमर्पण केलेल्या नक्षलींपैकी काही जणांना सुद्धा पोलिस स्टेशनमध्ये बोलावण्यात आले आहे. त्यानंतरच हा सह्याद्री उर्फ मिलिंद तेलतुंबडे होता किंवा नाही हे स्पष्ट होईल. अशी माहिती गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिली.

कोण आहे सह्याद्री उर्फ मिलिंद तेलतुंबडे?

मिलिंद तेलतुंबडे हा आरोपी असून त्याला फरार घोषित करण्यात आले आहे. त्याला माओवाद्यांचा प्रमुख कार्यकर्ता म्हणून ओळखले जाते. मिलिंदवर 50 लाखांचे बक्षीस आहे. भीमा कोरेगाव प्रकरणात एनआयएने दाखल केलेल्या आरोपपत्रात तो आरोपी असून फरार आहे. तो आनंद तेलतुंबडे यांचे भाऊ आहेत. बंधूंचा काही संबंध नाही पण एजन्सीचे म्हणणे आहे की, मिलिंदने बंदी घातलेल्या संघटनेच्या चळवळीचा विस्तार करण्यासाठी आनंद यांच्या साहित्यांचा वापर केला. 1 मे 2019 रोजी झालेला आयईडी स्फोट मिलिंद तेलतुंबडे यांनी केल्याचा पोलिसांना संशय आहे.

अशी झाली कारवाई

आतापर्यत 26 मृतदेह हाती लागले असून जंगलात शोधकार्य सुरू आहे. त्यात आणखी एखादे दोन नक्षल्यांचे मृतदेह हाती लागण्याची शक्यता गडचिरोलीचे एस. पी. अंकित गोयल यांनी दिली. सकाळी 6 ते दुपारी 2.30 अशी साडे आठ तास चकमक चालली. यात सी-60 तुकडीचे पाच जवान जखमी झाले. त्यांना उपचारार्थ नागपुरला हलवण्यात आले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सी-60 जवान काही गावांमध्ये शोध मोहीम राबवत असताना त्यांना जंगलात मोठ्या प्रमाणात नक्षलवादी आल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार कमांडो तुकड्यांनी नक्षल्यावर सकाळी 6 वाजताच्या सुमारास हल्ला चढवला. यात पोलिस व नक्षल्यांत तुंबळ लढाई झाली. कोरची येथील सी-60 कमांडोच्या 5 व गडचिरोली येथील दहापेक्षा अधिक अशा सुमारे 200 जवानांनी नक्षल्यांना डोके वर काढू दिले नाही. दोन्ही बाजूंनी तुफान गोळीबार झाला. यात 26 नक्षली ठार झाल्याची माहिती गोयल यांनी दिली.

कोण आहेत C-60 नक्षलविरोधी कमांडो?
गडचिरोली जिल्ह्याच्या स्थापनेपासून संपूर्ण परिसरात नक्षलवादी कारवाया वाढल्या आहेत. यावर बंदी घालण्यासाठी तत्कालीन एसपी केपी रघुवंशी यांनी 1 डिसेंबर 1990 रोजी सी-60 ची स्थापना केली. त्यावेळी या दलात केवळ 60 विशेष कमांडोची भरती करण्यात आली होती, ज्यावरून हे नाव मिळाले. नक्षलवादी कारवाया रोखण्यासाठी गडचिरोली जिल्ह्याचे दोन भाग करण्यात आले. प्रथम उत्तर विभाग, दुसरा दक्षिण विभाग.

प्रशासकीय कामही करतात सी-60 कमांडो
या कमांडोंना विशेष प्रशिक्षण दिले जाते. त्यांना दिवसा किंवा रात्री कोणत्याही वेळी कारवाईचे प्रशिक्षण दिले जाते. त्यांचे प्रशिक्षण हैदराबाद, एनएसजी कॅम्प मानेसर, कांकेर, हजारीबाद येथे केले जाते. नक्षलविरोधी अभियानासोबतच हे जवान नक्षलवाद्यांचे कुटुंबीय, नातेवाईक यांनाही भेटून त्यांना शासनाच्या योजनांची माहिती देऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात जोडतात. नक्षलग्रस्त भागातील प्रशासकीय समस्यांची माहितीही ते गोळा करतात.

बातम्या आणखी आहेत...