आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पत्रकारितेच्या क्षेत्रात राहून समाजात जनजागृती करणाऱ्या तसेच समाजातील वंचितांचा जीवनस्तर उंचावण्यासाठी योगदान देणाऱ्या पत्रकारांना दिल्या जाणाऱ्या अरविंदबाबू देशमुख प्रतिष्ठानच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून यंदा प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार ‘लोकमत’चे सल्लागार संपादक दिनकर रायकर यांना जाहीर झाला आहे. तर, ‘दिव्य मराठी’चे राज्य संपादक संजय आवटे यांना मुद्रित माध्यमातील उत्कृष्ट कामगिरीसाठी विशेष पुरस्काराने गाैरवण्यात येणार आहे.
या पुरस्कारांची घोषणा प्रतिष्ठानचे सदस्य व अरविंदबाबू देशमुख पत्रकारिता पुरस्कार समितीचे कार्याध्यक्ष डॉ. आशिष देशमुख यांनी पत्रकार परिषदेत केली. १ लाख रुपये, मानचिन्ह, मानपत्र असे मुख्य पुरस्काराचे स्वरूप आहे. विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या सत्कारमूर्तींना रोख राशी, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येईल.
पुरस्कारप्राप्त अन्य मान्यवरांत नीलेश खरे, विश्वास वाघमोडे (इंडियन एक्स्प्रेस, मुंबई), राधेश्याम जाधव (हिंदू बिझनेस लाइन, पुणे), तुषार खरात (लय भारी, मुंबई), देवेंद्र गावंडे (लोकसत्ता, नागपूर), मेघना ढोके (लोकमत, नाशिक), महेंद्र महाजन (सकाळ, नाशिक) यांचा समावेश आहे. हे पुरस्कार फेब्रुवारी-मार्च २०२१ मध्ये नागपूर येथे आयोजित सोहळ्यात प्रदान करण्यात येतील. या वेळी अरविंदबाबू देशमुख पत्रकारिता पुरस्कार समितीचे अध्यक्ष रणजितबाबू देशमुख, कार्यवाह प्रा. जवाहर चरडे आणि प्रा. युवराज चालखोर उपस्थित होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.