आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काॅंग्रेसमधूनच मागणी:अपमानीत होण्यापेक्षा मल्लिकार्जुन खर्गेंनी शरद पवारांचा आदर्श घेऊन राजीनामा द्यावा - आशिष देशमुखांची मागणी

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

''पुढच्या काळामध्ये महाविकास आघाडी राज्यामध्ये अस्तित्वात राहणार नाही, सोनीया गांधींच्या काळातही राहुल गांधीच निर्णय घेत होते. त्यामुळे अपमानीत होण्यापेक्षा मल्लिकार्जुन खर्गे यांनी शरद पवारांचा आदर्श घेऊन राजीनामा द्यावा, असे वक्तव्य काँग्रेसचे माजी आमदार आशिष देशमुख यांनी केले. ते आज नागपूर येथे बोलत होते. त्यांच्या या मागणीने खळबळ उडाली आहे.

राऊतांच्या वक्तव्यानंतर टीका

शरद पवार यांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर राष्ट्रवादी पक्ष नेतृत्वासंदर्भात आणि काँग्रेस पक्ष नेतृत्वासंदर्भात वेगळीच चर्चा रंगली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे असले तरी महत्वाचे निर्णय राहुल गांधीच घेतात, असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संजय राऊत यांना त्याच शब्दात उत्तर दिले होते.

देशमुखांनी घेतला राऊतांच्या वक्तव्याचा आधार

यासंदर्भात संजय राऊत यांच्या दाव्यावर बोलतांना माजी आमदार आशिष देशमुख यांनी खर्गे यांनी राजीनामा देण्याची मागणी केली. मल्लिकार्जुन खर्गेंच्या संदर्भात बोलायचे झाल्यास, काँग्रेसचे सर्वच निर्णय राहुल गांधी हेच घेतात असे दिसून येते. २८ ऑक्टोबर २०२२ ला मल्लिकार्जुन खर्गे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले.

..त्यांना अजूनही रिक्त पदे भरता आली नाही

त्यावेळी मी डॉ. शशी थरूर यांच्या सोबत होतो. या एप्रिल महिन्याच्या अखेरीस त्यांना येऊन सहा महिने उलटून गेले. पण अजूनपर्यंत त्यांना एआयसीसीमधले जनरल सेक्रेटरी किंवा बाकीचे पदाधिकारी यांची पदे भरता आली नाहीत. सीडब्ल्यूसीसाठी रायपूर येथील प्लेनरी सेशन होऊनसुद्धा अडीच महिने झाले. राहुल गांधी ही निवड होऊ देत नाही आहेत का? हा प्रश्न आहे.

तेव्हाही राहुल गांधीच निर्णय घ्यायचे

शरद पवार यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने प्रशंसनीय आणि इतरांना प्रेरित करणारा निर्णय घेतला आहे. काँग्रेसमध्येही सद्य परिस्थिती आजचीच नाही, तर ती गेल्या अनेक वर्षापासूनची आहे. २०१९ मध्ये राहुल गांधी यांनी काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर राजीनामा दिला होता आणि त्यानंतर सोनिया गांधी पक्षाच्या अध्यक्षपदी आल्या होत्या. त्या कालावधीमध्ये देखील एकही दिवस एआयसीसीच्या कार्यालयात न येता राहुल गांधी हेच काँग्रेसचे देशपातळीवर सर्व निर्णय घेत होते, हे कोणताही जबाबदार व्यक्ती सांगेल.

...तर खर्गेंनी पदमुक्त व्हावे

शरद पवार यांनी एक चांगले पाउल उचलले आहे. सातत्याने अपमान होत असेल तर त्याच पद्धतीने खर्गे यांनी या वयात पदमुक्त व्हावे. जेणेकरून एखाद्या तरुण व्यक्तीला काँग्रेसच्या अध्यक्षपदी संधी मदत मिळेल.

थरुर यांना संधी हवी होती

डॉ. शशी थरूर सारख्या चांगल्या व्यक्तीच्या पाठीशी तरुण लोकं उभे झाले होते. त्यांना संधी मिळाली असती तर काँग्रेसला नक्कीच चांगले दिवस बघता आले असते. खर्गे राहुल गांधी यांच्या आदेशानेच काम करीत आहेत.