आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर आपल्या हकालपट्टीचे खापर फोडीत बडतर्फ आशिष देशमुख यांनी आपली भडास काढली आहे. भाजपचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना २०१९ मध्ये त्यांच्या गृह मतदार संघात, दक्षिण-पश्चिम नागपूरमध्ये लढण्यास काँग्रेसकडून कोणी तयार नव्हते. तेव्हा मी संपूर्ण ताकदीनिशी विधानसभेची निवडणूक लढविली. माझ्या विरोधात झालेल्या लढतीत त्यांचे मताधिक्य मी कमी करू शकलो. तेव्हापासून मी प्रदेशाध्यक्षांना खुपत होतो, असा आरोप त्यांनी निवडक पत्रकारांशी बोलताना केला.
आशिष देशमुख म्हणाले की, याच काळात नाना पटोले काँग्रेसमध्ये सक्रिय होत होते. आपली भाजपची खासदारकी सोडून त्यांचा प्रवेश काँग्रेसमध्ये झाला होता. त्यांनी नागपूरमधून लोकसभा लढविली होती. मी दक्षिण-पश्चिम नागपूर मधून विधानसभा लढविली होती. त्यांच्या मनात माझ्याबद्दल द्वेष असावा. किंवा त्यांना वाटले असेल की, मी कॉंग्रेसमध्ये राहूच नये. त्या अनुषंगाने मागील ३-४ वर्षात त्यांच्याकडे काँग्रेसचे सर्व अधिकार आल्यानंतर हे द्वेषाचे राजकारण घडत गेले, असे मला वाटते. कारणे दाखवा नोटीसीला मी समाधानकारक उत्तर दिले आणि त्यानंतर मला पक्षातून बडतर्फ करण्यात आले असा आरोप देशमुख यांनी केला आहे.
माझ्याकडे काँग्रेसचे सरचिटणीस पद होते. मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पार्लियामेंटरी बोर्डावर होतो. त्यानुसार पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील राज्याची शिस्तपालन समिती माझ्यावर बडतर्फीचा निर्णय घेऊ शकत नाही. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीची शिस्तपालन समितीला बडतर्फीचा अधिकार आहे. प्रदेशाचा पदाधिकारी असेल किंवा पार्लियामेंटरी बोर्डाचा सदस्य असेल, त्यावर अशा प्रकारची कारवाई करण्याचा अधिकार राज्याच्या शिस्तपालन समितीला नाही. मला पक्षातून काढण्याचा एकप्रकारे कट रचण्यात आला. हा कट कोणी रचला हे आपण समजू शकता. त्यानंतरचे नोटीस प्रकरण सर्वांना माहित आहे, यावर सविस्तर पृथ्वीराज चव्हाण हेच सांगू शकतात असे ते म्हणाले.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संपूर्ण संविधान मी वकिलांकडे बसून चाळले. मी कोर्टात गेलो तर माझी बडतर्फी राज्याची शिस्तपालन समिती करू शकत नाही, हे सिद्ध करता येईल. पण हे करायचे की नाही यावर मी अजूनपर्यंत निर्णय घेतला नाही. या बडतर्फीच्या निर्णयाच्या विरोधात कोर्टात दाद मागायची का, हे ठरवावे लागेल. एखाद्या पक्षाच्या संविधानाला कोर्टात आव्हान देता येते. कोर्टाने जर हा बडतर्फीचा निर्णय अमान्य केला तर एक चांगली चपराक या लोकांवर बसू शकते असा इशारा देशमुख यांनी दिला आहे.
इतर बातम्याः
मोदींना श्रेय मिळेल म्हणून विरोधकांना पोटशूळ; नव्या संसद भवन उदघाटनावरून एकनाथ शिंदेंचे शरसंधान
विलासराव देशमुखांच्या जयंतीदिनी रितेश - जिनिलीया भावुक; म्हणाले - रोज तुमची आठवण येते, मिस यू पप्पा!
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.