आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर गच्छंतीच...:राहुल गांधींची माफी आणि प्रदेशाध्यक्षांवरील जहरी टीका भाेवली, आशीष देशमुख काँग्रेसमधून निलंबित

नागपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजी आमदार आशिष देशमुख यांना नेते राहुल गांधींकडे केलेली माफीची मागणी आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर केलेली टीका भोवली. देशमुख यांना काॅंग्रेसमधून निलंबित केले असून त्यांचे प्राथमिक सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे.

‘राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाची माफी मागावी’ आणि ‘महिन्याचा एक खोका नाना पटोलेंना मिळत आहे’ अशी पक्षविरोधी वक्तव्ये करणारे आशीष देशमुख यांना शिस्तपालन समितीने कारणे दाखवा नोटीस बजावली असून खुलासा मागितला आहे. खुलासा समाधानकारक राहिला नाही तर मग पक्षातून निष्कासित करण्यात येईल असा इशारा दिला होता. विशेष म्हणजे देशमुख यांना दिलेली मुदत शुक्रवारी अर्थातच आज संपली.

छत्रपती संभाजीनगरच्या सभेत नाना पटोले अनुपस्थित राहिले होते. त्यावरून आशीष देशमुख यांनी नाना पटोलेंवर गंभीर आरोप केले होते. “नाना पटोले ‘वज्रमूठ’ सभेत गैरहजर होते. त्यानंतर ठणठणीत असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु, मला मिळालेल्या माहितीनुसार प्रदेशाध्यक्ष सूरतच्या मार्गावर होते. सूरतच्या मार्गावर कोण असते, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. १६ तारखेला महाविकास आघाडीची नागपूरला सभा आहे. तोपर्यंत प्रदेशाध्यक्ष गुवाहाटीला पाहण्यास मिळतील. जबाबदारीने हे वक्तव्य करतोय,” असे आशीष देशमुख यांनी सांगितले होते.

महिन्याचा एक खोका नाना पटोलेंना मिळत आहे. प्रदेशाध्यक्ष कधी नवीन सरकारच्या प्रमुखांवर बोलताना दिसत नाहीत, पण उपमुख्यमंत्री आणि भाजपाच्या विरोधात बोलताना सातत्याने दिसतात. याच्यामागे तो खोका कारणीभूत आहे का? अशी चर्चा मुंबईत केली जात आहे. याचे योग्य ते पुरावे देईन, असा आरोप आशीष देशमुख यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला होता. तर जाहीर पत्रक काढून राहुल गांधींनी ओबीसी समाजाची माफी मागावी असे सांगितले होते. ही दोन्ही वक्तव्ये देशमुख यांना भोवली. परिणामी त्यांचे प्राथमिक सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे.