आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याबद्दल उघडपणे टीका करणाऱ्या काँग्रेस नेते आशिष देशमुख यांच्यावर कारवाई करण्यासाठी शिस्तपालन समितीची नेमणुक करण्यात आली आहे. मात्र असे असले तरी अजूनही आशिष देशमुख यांना कुठलीही नोटीस मिळालेली नाही. त्यामुळे काँग्रेस अंतर्गतच ताळमेळ नसल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
नाना पटोले हे छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या महाविकास आघाडीच्या सभेला गैरहजर होते. पटोले आजारी असल्याने येऊ शकले नाहीत अशी माहिती काँग्रेस नेत्यांनी दिली होती. मात्र दुसऱ्या दिवशी नाना पटोलेंनी आपल्याला बरे असल्याचे सांगत माध्यमांना देण्यात आलेली माहिती चुकीची असल्याचे म्हटले होते. यानंतर खुद्द काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी नाना पटोलेंवर टीकास्त्र डागले होते.
काय म्हणाले देशमुख?
आशिष देशमुख यांनी महाविकास आघाडीच्या सभेनंतर नाना पटोले यांच्यावर टीका केली होती. आशिष देशमुख म्हणाले, नाना पटोले हे महाविकास आघाडीची वज्रमूठ सैल करण्यासाठी खोडा घालत आहेत. नागपूरमध्ये 16 एप्रिलला मविआची वज्रमूठ सभा होत असताना नाना पटोले सांगतात की, 21 ते 25 एप्रिलदरम्यान राहुल गांधींची नागपूरमध्ये सभा होणार आहे. राहुल गांधींची 16 एप्रिलऐवजी वेगळी वेळ मागणे हे नाना पटोलेंच्या वेगळी चूल मांडण्याचे संकेत असल्याचा दावा देशमुख यांनी केला होता.
एक कारण मिळाले नाही
मी काँग्रेस पक्षाच्या हिताच्या दृष्टीने वक्तव्य केल्याचे आशिष देशमुख यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, माझ्यावर कारवाई करण्याचे काही कारण नाही. आमदारकीला एक वर्ष बाकी असताना मी काँग्रेसमध्ये आलो. मला कारवाईची नोटीस मिळाली नाही. शिस्तपालन समितीने तीन तास बैठक घेतली. तरीही त्यांना माझ्या विरोधात एक कारण मिळाले नाही.
शिस्तपालन समितीची बैठक
काँग्रेसच्या शिस्तपालन समितीची बैठक झाली. त्यानंतर आशिष देशमुख यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र योग्य ईमेल आयडी देऊनही नोटीस मिळाली नसल्याचा दावा देशमुखांनी केला आहे. त्यामुळे नाना पटोले यांना आशिष देशमुख यांच्यावर मनासारखी कारवाई करण्यापासून थांबवण्यासाठी काँग्रेसचेच काही सदस्य मदत करत नाही ना, अशी चर्चा सुरु आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.