आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापी. व्ही. नरसिंहरावांच्या पुतळा अनावरणाचे निमंत्रण राज्यपालांनी नाकारले!: अशोक चव्हाण
--
रामटेक येथील संस्कृत विद्यापीठ परिसरात उभारलेल्या माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचे निमंत्रण राज्यपालांनी नाकारल्याची माहिती असून, हे अनुचित असल्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.
राज्यपालांना विनंती केली होती
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे विधान केले. चव्हाण म्हणाले की, येत्या 21 डिसेंबर रोजी रामटेकच्या कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापिठाचा दीक्षांत समारोह नियोजित आहे. याच वेळी विद्यापिठाच्या परिसरात उभारण्यात आलेल्या पी.व्ही. नरसिंहराव यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याची विनंती विद्यापीठ प्रशासनाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना केली होती. मात्र, त्यांनी हे निमंत्रण स्वीकारले नसल्याची माहिती आहे.
एक दिवस आधी अनावरण
एवढेच नव्हे तर राज्यपाल येण्यापूर्वीच या पुतळ्याचे अनावरण करून घ्या, असेही राज्यपाल कार्यालयाने कळविल्याचे सांगितले जाते. त्यामुळे विद्यापिठाने राज्यपाल येण्याच्या अवघ्या एक दिवस आधी 20 डिसेंबर रोजी या पुतळ्याचा अनावरण सोहळा आयोजित केला आहे.
उत्तुंग व्यक्तीमत्व
माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव हे काँग्रेसचे नेते असले तरी ते देशाचे पंतप्रधान होते. देशातील एक उत्तुंग व विद्वान नेते म्हणून त्यांची ओळख होती. विशेष म्हणजे ते रामटेक लोकसभा मतदारसंघाचे खासदारही राहिले होते. देशाची अर्थव्यवस्था नाजूक असताना त्यांच्या काळात देशामध्ये अनेक महत्वपूर्ण आर्थिक सुधारणा करण्यात आल्या होत्या.
तर योग्य ठरले असते
महाराष्ट्राचे आणि देशाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या पी. व्ही. नरसिंहराव यांच्या पुतळ्याचे अनावरण राज्यपालांनी केले असते तर ते अधिक योग्य ठरले असते, असे सांगून २१ डिसेंबर रोजी कुलपती या नात्याने दीक्षांत समारोहासाठी राज्यपाल विद्यापिठात येत असताना देशाच्या माजी पंतप्रधानांच्या पुतळ्याचे अनावरण आदल्या दिवशीच उरकून घेण्यामागे नेमके प्रयोजन तरी काय? असा प्रश्नही अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.