आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:नक्षलग्रस्त भागात आश्रमशाळा कर्मचाऱ्याने तेवत ठेवला ज्ञानाचा दिवा; मुलांचे शिक्षण थांबू नये म्हणून गोंदिया जिल्ह्यात चावडीवरच्या शाळेचा उपक्रम

गोंदिया4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शिक्षणाची गंगोत्री अखंड राहावी

कोरोना महामारीच्या भीषण परिस्थितीत जेव्हा शाळा बंद आहेत, मुले शाळेपासून आणि शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर गेली आहेत अशा काळात गोंदिया जिल्ह्यातील नक्षलग्रस्त देवरी तालुक्यात चिचगड परिसरातील वांढरासारख्या अतिसंवेदनशील आणि आदिवासी भागात चावडीवर दररोज शाळा भरवली जाते. कोरोना काळात शाळा बंद असल्या तरी मुलांच्या शाळेची, शिकण्याची सवय सुटू नये म्हणून बालकांच्या सर्वांगीण विकासाचा आणि समाजसेवेचा वसा घेऊन आदिवासी विकास विभागातील गृहपाल किशोर देशकर हे पत्नी व मित्रासोबत ज्ञानदानाचे महत्त्वपूर्ण कार्य मागील वर्षभरापासून अविरतपणे करत आहेत.

चावडीवरच्या शाळेचा हा अभिनव प्रयोग आपल्या जिल्ह्यातच नव्हे, तर देशात पोहोचावा आणि कोणतेही बालक शिक्षणाच्या प्रवाहापासून वंचित राहू नये म्हणून देशकर दांपत्याने चावडीवरच्या शाळेतील मुले आणि त्यांचे पालक यांना सोबत घेऊन “चावडीवरची शाळा” हा अभिनव उपक्रम मागील वर्षापासून सुरू केला आहे. देवरीपासून १० किमी अंतरावर असलेल्या चिचगड परिसरात दररोज जाऊन विद्यार्थ्यांवर ते शिक्षणाचा संस्कार करत आहेत. याच माध्यमातून पशुपक्षी आणि प्राण्यांबद्दल माहिती व्हावी म्हणून “प्रोजेक्ट धरती बचाव”अंतर्गत पक्ष्यांसाठी घरटी आणि पाण्याची व्यवस्था पण करण्यात आलेली आहे. श्रीराम मंदिराच्या परिसरात विद्यार्थ्यांनी वृक्षारोपणही केले आहे.

शिक्षणाची गंगोत्री अखंड राहावी
कोरोनामुळे शाळा बंद आहेत. याचा परिणाम मुलांवर होत आहे. या काळात उदासीन झालेल्या व मनावर निराशेची झालर ओढलेल्या बालमनाचा शिक्षणाचा प्रवाह मोडू नये, त्यांची ज्ञानगंगोत्री अशीच अखंडित प्रवाहित राहावी म्हणून आपण सर्वांनी या देशकार्यात सहभागी व्हावे आणि सहकार्य करावे. - किशोर देशकर

शिक्षणासोबतच खेळ, योगासने
नक्षलग्रस्त आणि आदिवासीबहुल क्षेत्रातील या चावडीवर विद्यार्थ्यांना दररोज निसर्गाच्या सान्निध्यात शैक्षणिक मार्गदर्शन, खेळ, व्यायाम, योगासने, प्राणायाम करायला लावतात. गप्पागोष्टी करत थोर पुरुषांचे चरित्र, प्रार्थना, भजन, आरती सांगतात. श्रीराम मंदिर परिसरात देशकर यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आलेले आहे. या नक्षलग्रस्त आणि आदिवासीबहुल क्षेत्रातील चावडीवर विद्यार्थ्यांना व्यसनमुक्ती,आरोग्य व स्वच्छतेचे धडे ते देत आहेत.बातम्या आणखी आहेत...