आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूर:जंगलातील लढाईत जखमी झालेल्या अवनीच्या मादी बछड्याचा मृत्यू, त्रितलमांगी येथे तिच्यावर उपचार सुरू होते

नागपूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पांढरकवडा येथील अवनी वाघिणीच्या मृत्युनंतर तिच्या बछड्यांची देखभाल पेंच व्याघ्र प्रकल्पात केली जात होती.

शिकारीचे संपूर्ण प्रशिक्षण देऊन जंगलात सोडलेला अवनी वाघिणीचा मादी बछडा दुसऱ्या वाघिणीशी झालेल्या लढाईत जखमी झाल्याने त्याला परत सुरक्षित पिंजऱ्यात आणण्यात आले होते. शनिवारी रात्री या मादी बछड्याचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. या मादी बछड्याच्या उजव्या बाजूच्या समोरच्या पायाला जखमा झाल्या होत्या. त्यामुळे शिकार करण्यात अडचणी येत होत्या. तिच्यावर वनखाते लक्ष ठेवून होते.

त्रितलमांगी येथे तिच्यावर एका बंदिस्त पिंजऱ्यात पशुवैद्यकांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते. शनिवारी सायंकाळी मादी बछड्याची तब्येत खालावल्याने तिला गोरेवाडा येथे हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या. दरम्यान रात्री १० वाजताच्या सुमारास तिचा मृत्यू झाल्याची माहिती पेंच व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक रवीकिरण गोवेकर यांनी दिली.

पेंच व्याघ्र प्रकल्पात शुक्रवार ५ मार्च रोजी मुक्त केलेला अवनी वाघिणीचा मादी बछडा दुसऱ्या वाघिणीबरोबर झालेल्या लढाईत सोमवार, ८ मार्च रोजी जखमी झाल्यानंतर तिला बेशुद्ध करून पुन्हा ताब्यात घेण्यात आले. त्या नंतर पूर्वीच्याच बंदिस्त अधिवासात सोडण्यात आले होते. परंतु तिची तब्येत बिघडल्याने तिच्यावर उपचार सुरू होते.

पांढरकवडा येथील अवनी वाघिणीच्या मृत्युनंतर तिच्या बछड्यांची देखभाल पेंच व्याघ्र प्रकल्पात केली जात होती. सुमारे दोन वर्षे तित्रलमांगी येथील पाच हेक्टर बंदिस्त अधिवासात राहिल्यानंतर त्यातील मादी बछड्याला खुल्या जंगलात सोडण्यात आले होते. जंगलातील वातावरणात हा मादी बछडा टिकाव धरू शकेल किंवा नाही याबाबत खात्री नसल्याने तिला रेडियो कॉलर लावण्यात आली होती. तसेच तिच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले होते. जंगलातील इतर वाघिणींशी संघर्ष होण्याची शक्यताही गृहित धरण्यात आली होती. या मादी बछड्याला सोडल्यापासून त्यावर वन विभागाच्यावतीने लक्ष ठेवण्यात येत होते.

सोमवारी सकाळी या बछड्याची दुसऱ्या वाघिणीशी झडप झाली. दुपारी ही वाघिण जखमी आढळून आली. जखमी अवस्थेत ती जंगलात टिकाव धरणे अशक्य असल्याचे मत पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी मांडल्यानंतर तिला बेशुद्ध करण्यात आले. तिला जेरबंद करून पुन्हा एकदा जुन्याच बंदिस्त अधिवासात सोडण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...