आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासर्वसामान्य माणसाचा महिन्यातील शेवटचा आठवडा रद्दी “वीक’ असतो. वर्तमानपत्रे, घरातील अनुपयोगी वा मोडीत निघालेल्या वस्तू विक्रीतून अनेकांचा छोटा खर्च भागतो. मात्र महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ म्हणजेच बालभारतीने अभ्यासक्रमातून रद्द झालेली पाठ्यपुस्तके लगद्यासाठी विकून चक्क ९४ लाख ५० हजार ८६८ रुपये मिळवले आहेत. माहिती अधिकारात ही माहिती देण्यात आली आहे.
समग्र शिक्षा मोफत पाठ्यपुस्तके योजनेंतर्गत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांतील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके उपलब्ध करून दिली जातात. तसेच खुल्या विक्रीसाठी प्रत्येक शैक्षणिक वर्षात मागील विक्रीचा अंदाज घेऊन अतिरिक्त १० टक्के पाठ्यपुस्तकांची छपाई करून उपलब्ध करून दिली जातात. शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये इयत्ता दुसरी व अकरावी तसेच २०२०-२१ मध्ये बारावीचा अभ्यासक्रम रद्द झाल्यामुळे नवीन पाठ्यपुस्तके छापावी लागली. त्यामुळे रद्द झालेली पाठ्यपुस्तके लगदा तयार करण्यासाठी कागद गिरण्यांना विकली जातात. त्यानुसार ४८९.१९० टन पाठ्यपुस्तकांच्या विक्रीतून बालभारतीला ९४ लाख ५० हजार रुपये मिळाल्याची माहिती देण्यात आली आहे. रद्द झालेल्या पाठ्यपुस्तकाचा गैरवापर टाळण्यासाठी म्हणून ही पुस्तके कागद गिरण्यांना विक्री केली जातात. सर्व शिक्षा अभियान ही भारतातील ६ ते १४ वर्षे वयोगटातील सर्व मुलांना प्राथमिक शिक्षण देणारी एक बहुव्याप्त योजना आहे. ही योजना केंद्र शासनाच्या शैक्षणिक कार्यक्रमांपैकी एक आदर्श (फ्लॅगशिप) योजना असून, प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण निर्धारित कालावधीत प्राप्त करणे, हा तिचा मूळ उद्देश आहे.
माहिती अधिकार कार्यकर्त्यास माहिती देण्यास टाळाटाळ
माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी २०१८-१९ ते २०२१-२२ या कालावधीत सर्व शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना मोफत देण्यासाठी किती तसेच खुल्या बाजारात विक्रीसाठी किती पाठ्यपुस्तकांची छपाई करण्यात आली, समग्र शिक्षा अभियानांतर्गत पुरवठा, खुली विक्री व शिल्लक पुस्तकांची माहिती मागितली होती. यात बालभारतीला फक्त आकडे तेवढे द्यायचे होते. मात्र बालभारतीने आकडे देण्याऐवजी कोलारकर यांनाच प्रति प्रत २ रुपये झेराॅक्स प्रमाणे ५२७ प्रतींसाठी १०९४ रुपये पाठवण्यास सांगितल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याशिवाय रजिस्टर्ड एडीने पाठवायचे झाल्यास पॅकिंगसह अतिरिक्त १ हजार रुपये पाठवण्यास सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.