आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भंडारा दुर्घटना:फायर ऑडिटबाबत रुग्णालये बेफिकीरच, मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा : फडणवीस; प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी : गृहमंत्री

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दै. दिव्य मराठीने राज्यातील जिल्हा रुग्णालयांत काय स्थिती आहे याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न केला

भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशू केअर युनिटमध्ये शुक्रवारी मध्यरात्री लागलेल्या आगीत गुदमरून १० नवजात शिशूंचा मृत्यू झाल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर दै. दिव्य मराठीने राज्यातील जिल्हा रुग्णालयांत काय स्थिती आहे याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता अनेक ठिकाणी फायर ऑडिट झालेच नसल्याचे स्पष्ट झाले. काही ठिकाणीच यंत्रणा सज्ज असल्याचे पाहायला मिळाले. राज्यातील महत्त्वाच्या शहरातील रुग्णालयांचा घेतलेला हा आढावा..

नाशिक : दाेन वर्षांपासून ऑडिट नाही
जिल्हा शासकीय रुग्णालयाकडूनच नागरिकांच्या जिवाशी खेळ केला जात असल्याचा प्रकार समाेर अाला अाहे. नियमाप्रमाणे या रुग्णालयाचे २०१८ मध्ये फायर अाॅडिट करण्यात अाले होते. मात्र, या अाॅडिटमध्ये सुचवण्यात अालेल्या उपाययोजनेची अद्यापपर्यंत पूर्तता करण्यात आली नसून केवळ कागदापुरतीच मर्यादित राहिलेली आहे. याच रुग्णालयातील अतिशय संवेदनशील असलेल्या नवजात अर्भक कक्षाची अग्निसुरक्षा देखील २ मुदत बाह्य झालेल्या अग्निरोधक सिलिंडरवरच अवलंबून असल्याची गंभीर बाब उघडकीस आली.

साेलापूर : आठवड्याला तपासणी

सिव्हिल रुग्णालयात असलेल्या शिशू केअर युनिटची प्रत्येक आठवड्याला इलेक्ट्रिशियनकडून तपासणी करून घेतली जाते. बालरोग विभागाकडून नोंदवही तयार केली असून प्रत्येक आठवड्याला त्या युनिटची पाहणी केल्यानंतर वायरमनची सही घेण्यात येते. सिव्हिल रुग्णालयाचे फायर ऑडिटही प्रत्येक वर्षी करण्यात येते, दोन महिन्यांपूर्वीची सिव्हिलचे फायर ऑडिट केले आहे. सिव्हिल व वैद्यकीय महाविद्यालयात अग्निरोधक सिलिंडर कार्यान्वित आहेत, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी दिली.

जळगाव : पुढील अाठवड्यात बैठक

जळगाव जिल्हा रुग्णालय गेल्या ३ वर्षांपासून जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी) कडे हस्तांतरित झाले अाहे. काेराेनामध्ये अक्षम्य दुर्लक्षाबाबत तत्कालीन अधिष्ठातांसह वैद्यकीय अधीक्षक यांचे निलंबन करण्यात आले. या रुग्णालयाचे फायर अाॅडिट कधी झाले याबाबतची माहिती नवीन वैद्यकीय अधीक्षकांकडे उपलब्ध नाही. भंडारा घटनेनंतर पुढील अाठवड्यात बैठकीचे अायाेजन तसेच संभाव्य दुर्घटना घडल्यास काय उपाय करायला हवेत याबाबत चर्चा करणार असल्याचे महाविद्यालयाचे अधिष्ठाता डाॅ. जयप्रकाश रामानंद यांनी सांगितले.

वर्धा : रुग्णालयातील यंत्रणा सज्ज

सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात अग्निशमन बंब,पाणी पाहण्याचे यंत्र बसवण्यात आले असून नूतनीकरण करण्यात आले असल्याची माहिती डॉ. चंद्रशेखर महाकाळकर यांनी दिली आहे. सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात ३५५ अग्निशमन बंब लावण्यात आले असून सोबतच पाणी मारण्याचे यंत्र लावण्यात आले आहे. मातृ शिशू विभागात यंत्र बसवण्यात आले आहे. अतिदक्षता विभागात सुद्धा यंत्र आहेत. सर्वांचे नूतनीकरण १० ऑगस्ट २०२१ पर्यंत करण्यात आल्याची माहिती डॉ. झोपाटे यांनी दिली.

बुलडाणा : जिल्हा रुग्णालय गाफील

येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात अग्निशमन करणाऱ्या साधनांबाबत प्रशासकीय यंत्रणा गाफील आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून या यंत्रणेने अग्निशमन करणाऱ्या सिलिंडरचे नूतनीकरण केले नाही. हे नूतनीकरण दरवर्षी करण्यात येते. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात आले असल्याने त्याची व्यवस्था ज्या कर्मचाऱ्याकडे होती त्याला गैरव्यवहार प्रकरणात नुकतेच निलंबित करण्यात आले आहे.

अकाेला : फायर अाॅडिटवरच प्रश्न

शहरातील सरकारी रुग्णालयातील फायर अाॅडिटवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे शुक्रवारी समाेर अाले. सर्वाेपचार रुग्णालय तथा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे फायर अाॅडिट सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाने केल्याचा दावा अधिष्ठाता डाॅ. कुसुमाकर घाेरपडे यांनी केला अाहे. मात्र, सर्वोपचार रुग्णालयाचे २०१६ पासून आणि जिल्हा स्त्री रुग्णालयाचे सन २०१२ पासून फायर ऑडिट झालेले नाही, असे पालिकेने सांगितले.

अमरावती : फायर ऑडिट ओके

अमरावती | शहरात जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन), जिल्हा स्त्री रुग्णालय (डफरीन) आणि डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय (पीडीएमसी) या तीन मोठ्या रुग्णालयांसह शंभरावर खासगी रुग्णालये आहेत. यापैकी सामान्यजनांशी संबंधित तिन्ही रुग्णालयांचे फायर ऑडिट ओके असून पीडीएमसीमध्ये फुल प्रूफ सिस्टिम, तर डफरीनमधील फायर एक्स्टिंग्विशर बदलण्याची प्रक्रिया सुरू आहे.

वाशीम : अग्निशमन यंत्रणा तत्पर

वाशीम | शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयात अप्रिय घटना टाळण्यासाठी अग्निशमन दल सदैव तयार असते. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारतीपासून हाकेच्या अंतरावर अग्निशमन दल आहे. या विभागातील कर्मचारी कुठलीच जीवित हानी न होऊ देता आपले काम चोखपणे बजावत असून भविष्यात भंडाऱ्यासारखी अप्रिय घटना घडली तर वाशीम जिल्ह्यातील अग्निशमन यंत्रणा या सज्ज आहेत.

यवतमाळ : दर २ महिन्यांनी तपासणी
येथील वसंतराव नाईक जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे फायर ऑडिट झालेले असल्याची माहिती नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने दिली आहे. या ठिकाणी नवजात शिशूंसाठी असलेल्या अतिदक्षता विभागात १४ खाटांची व्यवस्था आहे. येथील सर्व वायरिंगची तपासणी दर २ महिन्यांनी विद्युत विभागाच्या माध्यमातून करण्यात येते.

जालना, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांत फायर ऑडिटच नाही
औरंगाबाद | मराठवाड्यातील जालना, बीड, उस्मानाबाद येथील जिल्हा रुग्णालयांत फायर ऑडिट झाले नाही. तसेच परभणी जिल्हा रुग्णालयात फायर ऑडिट करण्यात येणार असून नांदेड आणि हिंगोली येथील जिल्हा रुग्णालयांतील फायर ऑडिट झाले आहे. दरम्यान, औरंगाबाद येथील रुग्णालयात फायर ऑडिटचे आदेश देण्यात आले आहेत.जालना : जिल्हा स्त्री रुग्णालयातील एसएनसीयूमध्ये अद्ययावत विद्युत फिटिंग आहे. मात्र, बिघाड झाल्यास दुरुस्तीला इलेक्ट्रिशियनच नाही. रुग्णालय प्रशासनाला फायर ऑडिटबाबत माहिती देता आली नाही.बीड : जिल्हा रुग्णालय हे काेविड हॉस्पिटल असल्याने बीड जिल्हा रुग्णालयातील नवजात बालकांचा अतिदक्षता विभाग ८ महिन्यांपासून खासगी रुग्णालयात आहे. बीडच्या जिल्हा रुग्णालयाचे फायर ऑडिट कधी झाले याची माहिती प्रशासनाला नाही. परभणी जिल्हा रुग्णालयासह उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयाचेदेखील स्पेशल फायर ऑडिट करण्यात येणार आहे.

नांदेड : नांदेडच्या विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील अतिदक्षता विभागात ३५ बालकांना उपचार मिळतील, अशी व्यवस्था आहे. यात अत्याधुनिक मशीन असून २४ तास इलेक्ट्रिशियन उपलब्ध असतो. वेळोवेळी फायर ऑडिट करण्यात येते, असे नवजात शिशू अतिदक्षता विभाग प्रमुख डॉ. सलीम तांबे यांनी सांगितले.हिंगोली : शासकीय रुग्णालयामध्ये नवजात शिशू अतिदक्षता विभाग आहे. या ठिकाणी एका वेळी दहा नवजात शिशूंवर उपचार केले जातात. येथे फायर ऑडिट करण्यात आले आहे.उस्मानाबाद जिल्हाभरात मोठ्या हॉस्पिटलमधील फायर ऑडिटच नाही. पालिका, जिल्हा प्रशासनही कोणतीच कारवाई करत नसल्याने येथील यंत्रणा एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच जागी होणार का, असा प्रश्न उपस्थित होत अाहे.

मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा : फडणवीस
नागपूर : भंडारा येथील घटना हलगर्जीपणामुळे झाली आहे. याप्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. याशिवाय दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांचे सुरक्षा ऑडिट होणे गरजेचे आहे. सहसंचालक आरोग्य विभाग यांना १२ मे २०२० ला जिल्हा सामान्य रुग्णालय, भंडारा येथील इमारतीत आग प्रतिबंधक उपाययोजनासाठी अंदाजपत्रक प्रारूप पाठवले होते. मात्र निर्णय झाला नाही.

प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी : गृहमंत्री
नागपूर : याप्रकरणी कोणालाही पाठीशी घालण्यात येणार नाही, असे सांगताना प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. या अहवालानंतर दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे देशमुख म्हणाले. दरम्यान, मंत्री विजय वडेट्टीवार, चंद्रशेखर बावनकुळे, पर्यावरणमंत्री संजय राठोड, विधान परिषद सदस्य मनीषा कायंदे, आमदार राजू कारेमोरे यांनी घटनास्थळी भेट दिली.

बातम्या आणखी आहेत...