आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आपत्ती पर्यटन:मृत्यूच्या दारात निर्लज्जांचा ‘भंडारा’, विश्रामगृहावर शिजले कोंबडे, मासे, झिंगे

नागपूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भंडाऱ्यात चुली बंद असताना, मंत्र्यांचा स्टाफ मटणावर ताव मारत हाेता

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात ८ जानेवारीच्या मध्यरात्री लागलेल्या आगीच्या धुरात गुदमरून दहा निष्पाप जीव गेले. त्यानंतर रुग्णालयाला भेट देणाऱ्या मंत्र्यांची रीघ लागली. यातच सोमवारी महिला व बालविकास मंत्र्यांनीही भेट दिली. मंत्री या दुर्घटनेबद्दल गंभीर होत्या, मात्र त्यांच्यासोबत आलेल्या स्टाफने निर्लज्जपणाचा कळस गाठत मासे, चिकन, मटणावर यथेच्छ ताव मारला. या मेजवानीचा व्हिडिओ समाजमाध्यमावर व्हायरल होताच संतापाची लाट निर्माण झाली आहे.

रुग्णालयात नवजातांचा बळी गेल्याच्या घटनेनंतर गावातील अनेक घरांत चुलीही पेटल्या नाहीत. त्या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांसह बरेच मंत्री भंडाऱ्याला आले. ते विश्रामगृहावर थांबले. मात्र, सर्वजण या घटनेबद्दल गंभीर दिसले. सोमवारी विश्रामगृहावर चक्क देशी कोंबडे, मासे आणि झिंगे शिजले. मंत्र्यांच्या दौऱ्यानिमित्ताने तिथे आलेल्यांनी त्यावर मस्त ताव मारला. स्वत: मंत्री मात्र या मेजवानीमध्ये सहभागी नव्हत्या.

राज्यातील कोणताही मंत्री जिल्ह्याच्या दाैऱ्यावर आला की संबंधित विभागांचे अधिकारी, कर्मचारी मंत्र्यांसोबतच त्यांच्या पीएंचीही सरबराई करतात. भंडाऱ्यात आलेल्या पाहुण्याने येथील झिंगे खाल्ले नाहीत, असे होत नाही. पण, त्याचीही काही वेळ-काळ असते. एरवी हे सर्व चालून गेले असते. पण, भंडाऱ्यात मेंदू बधिर करणारे वातावरण असताना, त्याचे काेणतेही भान न ठेवता सोमवारी जे घडले त्याने बेशरमपणाची हद्द ओलांडली. रुग्णालयांची वाईट अवस्था, मृत बाळांच्या घरी काय परिस्थिती आहे, याची पाहणी करण्यासाठी आणि पीडितांचे अश्रू पुसण्यासाठी राज्यातील मंत्री येत आहेत. याचे भान ठेवून त्यांच्या जेवणासाठी काय व्यवस्था केली पाहिजे, याचा विचार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी करणे अपेक्षित हाेते.

किंचितही कल्पना नाही
विश्रामगृहावर काय घडलं, याची मला किंचितही कल्पना नाही. भंडाऱ्यात दाेन ठिकाणी माझ्या भेटी हाेत्या. काेण काय खातं, याकडे मी लक्ष देऊ शकत नाही. याबाबत माझा काहीही संबंध नाही. तुम्ही संबंधित अधिकाऱ्यांना विचारा. - यशाेमती ठाकूर, महिला व बालविकास मंत्री.

काही घरात अन्नही शिजत नाही; विश्रामगृहावर मज्जा
- भंडाऱ्यातील घटनेने अनेकांचे डाेळे अजूनही आेले आहेत. घटनेच्या तिसऱ्या दिवशीच अशा प्रकारची सरबराई करण्याचा विचार तरी कसा मनात येऊ शकताे?
- अनेकांच्या घरात मागील चार दिवसांपासून चूलही पेटलेली नाही. मात्र, सांत्वनपर भेटीला आलेल्यांना कोंबडे, मासे, झिंगेच का हवे हाेते?

- ही खास व्यवस्था करणाऱ्यांवर कठाेर कारवाईची गरज आहे.

- विश्रामगृहावर काही कर्मचारी चिकन, मासे आणि झिंग्यांवर ताव मारतानाचे व्हिडिओ समाजमाध्यमावर झळकल्यानंतर खळबळ उडाली. त्यासोबतच संताप व्यक्त करण्यात येत आहे.

शवविच्छेदन कागदावरच
दहापैकी केवळ दोन बालकांचे शवविच्छेदन केले तर उर्वरित आठ बालकांचे शवविच्छेदन न करताच ते कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. या बालकांच्या मृत्यूचा अहवाल केवळ कागदोपत्री तयार केल्याचा प्रकार समोर आला आहे.

आगीत दोन बालकांचा होरपळून तर आठ बालकांचा श्वास गुदमरून मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देश हादरला. या दुर्घटनेत ज्या दहा नवजात बालकांचा मृत्यू झाला, त्यात आठ मुलींचा समावेश आहे, तर उर्वरित दोन मुले होती. या दुर्घटनेनंतर अनेक कुटुंबांवर शोककळा पसरली. मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या अग्नितांडवानंतर मृतांच्या कुटुंबीयांना सकाळ होईस्तोवर माहिती दिली नाही. मध्यरात्रीच्या घटनेनंतर पालकांना सकाळी थेट बालकांचा मृतदेहच त्यांच्या हातात देऊन त्यांना रुग्णवाहिकेत बसवून थेट गावाला पोहोचवण्याचा अमानुषपणा प्रशासनाने केला.

बातम्या आणखी आहेत...