आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा९ जानेवारी २०२१ ची सकाळ संपूर्ण राज्याला हादरवणारी ठरली. भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील नवजात शिशू केअर युनिटमध्ये ९ जानेवारी २०२१ च्या मध्यरात्री लागलेल्या आगीत गुदमरून १० नवजात शिशूंचा मृत्यू झाला. यात तीन बालकांचा होरपळून, तर ७ बालकांचा श्वास गुदमरून मृत्यू झाला. ही काळोख रात्र भंडाराच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्र कदापि विसरणार नाही. लागलेल्या या आगीत हादरलेले चेहरे आणि मातापित्यांच्या किंचाळ्यांनी मन हेलावून टाकणारे होते. या घटनेला एक वर्ष पूर्ण होत आहे. याप्रकरणी दोन परिचारिकांवर दोष ठेवून त्यांची सेवा समाप्त करण्यात आली. मात्र, बाकी यंत्रणा मोकाटच आहे.
या घटनेनंतर जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासन असो वा राज्य सरकार हे या सर्व गोष्टीला जबाबदार असल्याचे खापर त्या मातापित्यांनी फोडले आहे. या दुर्घटनेनंतर भंडारा जिल्ह्यात अगदी चार दिवसांत मुख्यमंत्र्यांपासून राज्यातील अवघे मंत्रिमंडळ धुराळा उडवत आले. दुर्घटनेत बालक गमावलेल्या माता-पित्यांचे सांत्वन केले. मात्र, या सांत्वनानंतरही या प्रकरणात दोषी असलेल्या आरोग्य यंत्रणा, इन्क्युबेटर सप्लाय करणारी कंपनी, फायर ऑडिट न करणारी एजन्सी असो किंवा या सर्व बाबीकडे दुर्लक्ष करणारी प्रशासकीय यंत्रणा आजही कारवाईपासून दूर आहे.
बाल शिशू केअर युनिटमध्ये लागलेल्या आगीची दाहकता कुणाच्याही कल्पनेपलीकडची ठरली. मध्यरात्रीच्या सुमारास लागलेल्या या आगीने प्रशासनासह कर्तव्यावरील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे मातापित्यांना आपली निरागस बालके गमवावी लागली. नुकत्याच जन्मलेल्या आणि त्यातील अनेकांना तर आपल्या मातापित्यांची तोंड ओळखही झाली नाही, अशांनी हे जग बघायच्या आत या कोवळ्या कळ्यांना आगीने आपल्या कवेत घेतले. ही विदारकता मानवी जीवनाचा थरकाप उडवणारी ठरली. त्यानंतर या प्रकरणाची राज्यात मोठ्या प्रमाणात चर्चा झाली.
एक वर्षानंतर रुग्णालयात बेबी केअर युनिटचे काम सुरू
जीवन देणारे इन्क्युबेटर ठरले कारणीभूत
ज्या इनक्युबेटरमध्ये बालकांना नवजीवन मिळणार होते, त्याच इनक्युबेटरमध्ये झालेल्या स्फोटाने बालकांच्या जीवनाची राखरांगोळी झाली. ज्यावेळी समोरील दृश्य बघितले, त्यावेळी तिथे असलेल्या बालकांसह संपूर्ण साहित्याची तेवढी राख बघायला मिळाली. सुदैवाने यातील काही बालकांना वाचवण्यात सामान्य रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना यश आले. मात्र, जी बालके जग सोडून गेले किंवा त्यांच्यामुळे मातापित्यांच्या मनातील पोकळी कदापिही भरून निघणारी नाही.
रुग्णालयाचे ऑडिट गुलदस्त्यात
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय जळीतकांडानंतर राज्य सरकारने फायर ऑडिटचे आदेश दिले होते. किंबहुना राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय रुग्णालयाचे फायर ऑडिट होणे बंधनकारक केले. मात्र, राज्यासह भंडारा जिल्ह्यातील किती रुग्णालयाचे ऑडिट झाले, हे अद्यापही गुलदस्त्यात आहे.
केअरचे ३६ युनिट्स १७ पासून सुरू
इन बॉर्न आणि आऊट बॉर्नमध्ये ५० युनिटची व्यवस्था केली आहे. त्यातील प्रत्येकी १८ असे एकूण ३६ युनिट सुरू करण्यात येणार आहेत. उर्वरित युनिटची गरज भासल्यास सुरू करता येईल. १७ जानेवारीपासून हे युनिट कार्यान्वित होतील. या युनिटसाठी २८ नर्स, पाच बालरोगतज्ज्ञ यांची नियुक्ती केली आहे. सोबतच सर्व कर्मचाऱ्यांना फायरचे ट्रेनिंग देण्यात आले असून फायर मॉक ड्रिल झालेली आहे. लवकरच ही यंत्रणा सुरू होणार आहे. - डॉ आर. एस. फारुकी, जिल्हा शल्यचिकित्सक, भंडारा.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.