आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभंडारा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग 53 वरील वन्य प्राण्यांच्या भ्रमण मार्ग परिसरात वन्यप्राण्यांसाठी भुयारी मार्ग बनविण्याचे काम सुरू आहे. मात्र हा भुयारी मार्ग वन्यप्राण्यांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहे. या ठिकाणी गेल्या पाच महिन्यांत वाहनाच्या धडकेत तीन बिबट्यांचा मृत्यू झाला आहे.
शिकारीच्या शोधात जंगल परिसरातून राष्ट्रीय महामार्ग 53 पार करणाऱ्या बिबट्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना लाखनी–साकोली महामार्गावर मुंडीपार सडकजवळ असलेल्या धाब्याजवळ बुधवारी रात्री 11ः20 वाजताच्या सुमारास घडली.
अज्ञात वाहनाकडून जबर धडक
या घटनेची माहिती तत्काळ वनविभागाला देण्यात आली. ठार झालेली मादी बिबट अंदाजे दोन वर्षे वयाची आहे. शिकारीच्या शोधात ती रात्री राष्ट्रीय महामार्ग ओलांडत असताना यादव धाबा आणि रॉयल धाबा यांच्यामध्ये पोहोचताच अज्ञात वाहनाने तिला जबर धडक दिली. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला. वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. रात्रीच बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेऊन लाखनी परिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या जांभळी नर्सरी येथे नेण्यात आला.
बिबट्याचा मृतदेह आढळला
भंडारा जिल्ह्यातील लाखनी-साकोली राष्ट्रीय महामार्ग 53 (जुना राष्ट्रीय महामार्ग 6) वरील वन्यजीव भुयारी मार्गाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याची ओरड नागरिक करीत आहेत. अशातच 20 नोव्हेंबर 2022 मध्ये एका बिबट्याचा रस्ता अपघातात मृत्यू झाला होता. शिवाय मागील महिन्यात याच परिसरात एका बिबट्याचा मृतदेह आढळला होता.
वन विभागाला हस्तांतरित करावा
लागोपाठ झालेल्या या घटनांमुळे खळबळ उडाली आहे. मात्र वनविभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप मानद वन्यजीव रक्षक नदीम खान यांनी केला आहे. हा भ्रमणमार्ग वनविकास महामंडळाच्या अधिनस्थ असून त्यांनी तो वन विभागाला हस्तांतरित करावा, अशी मागणी नदीम खान यांनी केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.