आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भंडारा:रुग्णालयातील उपकरणांच्या देखभालीकडे दुर्लक्ष ठरले जीवघेणे, चेन्नईस्थित कंपनीला दिले होते राज्यभराचे कंत्राट

भंडारा / प्रशांत देसाईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील सर्व जिल्हा सामान्य रुग्णालयांतील उपकरणे हाताळणे व त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी राज्य शासनाने तीन वर्षांपूर्वी चेन्नईस्थित फेबर सिंदुरी या कंपनीला कंत्राट दिले. या कंपनीच्या माध्यमातून सामान्य रुग्णालयात एक अभियंता नियुक्त करून त्याच्या माध्यमातून सर्व उपकरणांची देखभाल-दुरुस्ती करणे गरजेचे आहे. मात्र, या कंपनी आणि अभियंत्यानेही याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे उपकरणांमध्ये झालेल्या बिघाडामुळेच भंडारा येथे जिल्हा रुग्णालयात दहा नवजात निष्पाप बालकांना जीव गमवावा लागल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यासंदर्भात आरोग्य विभागाच्या उपसंचालक कार्यालयातील एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर ही माहिती दिली.

शासकीय रुग्णालयातील रुग्णसेवा अत्याधुनिक व्हावी, यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्हा सामान्य रुग्णालयात अत्याधुनिक यंत्रसामग्री बसवण्यात आली. या यंत्रसामग्रीच्या देखभाल-दुरुस्ती व उपकरण हाताळण्याच्या जबाबदारीचे कंत्राट तीन वर्षांपूर्वी शासनाने फेबर सिंदुरी कंपनीला दिले. या करारानुसार या कंपनीला राज्यातील सर्व जिल्हा सामान्य रुग्णालयातील उपकरणे हाताळणे व त्यात काही त्रुटी आढळल्यास त्याची दुरुस्ती करून ते वापरणे योग्य असल्याची खातरजमा करणे गरजेचे होते. यासाठी कंपनीच्या माध्यमातून प्रत्येक जिल्हा सामान्य रुग्णालयातील उपकरणे हाताळण्यासाठी एका अभियंत्याची नियुक्ती करणे गरजेचे आहे. कंपनीने उपकरणांच्या देखभाल दुरुस्तीसाठी एक कालबद्ध कार्यक्रम तयार करायचा असतो. त्या शेड्यूलनुसार कंपनीच्या या अभियंत्याने दर महिन्याला उपकरणांची देखभाल दुरुस्ती करणे गरजेचे आहे. सदर तपासणी अंती उपकरणे उपयोगात आणणे बंधनकारक आहे.

मात्र, कंत्राट मिळाल्याच्या सुरुवातीच्या काही दिवसांत कंपनीकडून नियमित उपकरणांची देखभाल दुरुस्ती केली. त्यानंतर मात्र दुर्लक्ष केले. याच दुर्लक्षामुळे जिल्हा रुग्णालयात नवजात शिशू केअर युनिटमध्ये लावलेल्या इनक्युबेटरमध्ये तांत्रिक बिघाड आला. मात्र, तपासणीअभावी तो तसाच सुरू राहिला आणि यातूनच ही दुर्घटना घडल्याचे आता समोर आले. त्यामुळे आता या कंपनीच्या कारभाराची चौकशी होणे गरजेचे झाले आहे. दरम्यान, या संदर्भात कंपनीशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून कोणतेही उत्तर मिळाले नाही.