आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भंडारा:चौथ्या दिवशी आली चौकशी समिती; सुरक्षा व्यवस्थेची चार तास पाहणी, अधिकारी-कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवले

भंडारा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा सामान्य रुग्णालयात घडलेल्या भीषण जळीतकांडाची चौकशी करण्याकरिता विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती आज सकाळी भंडाऱ्यात दाखल झाली. या समितीने सुरुवातीला रुग्णालयाची पाहणी करून नंतर सुमारे चार तास चौकशी केली.

मंगळवारी सकाळी ११.३० च्या सुमारास जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झालेली ही समिती दुपारी ३.३० पर्यंत तिथे होती. समितीने जळीतकांड झालेल्या शिशू कक्षासह रुग्णालयाची पाहणी केली. त्यानंतर नर्स, डॉक्टर्स, अटेंडंट, इन्चार्ज यांची चौकशी करून त्यांचे जबाब नोंदवले. आगीचे नेमके कारण, रुग्णालयातील फायर एक्स्टिंग्विशर, स्ट्रक्चरल आणि फायर ऑडिट तसेच इतर सुरक्षात्मक बाबींची चौकशी या समितीने केली. या चौकशी समितीमध्ये आरोग्य विभागाचे आयुक्त रामस्वामी, मुंबई अग्निशमन विभागाचे प्रमुख पी. एस. रहांगडाले यांच्यासह इतर विभागांच्या तज्ज्ञांचा समावेश आहे.

दरम्यान, ही चौकशी समिती रुग्णालयात असताना माध्यम प्रतिनिधींना त्यांच्याशी बोलू दिले गेले नाही. ही चौकशी समिती आपला अंतरिम अहवाल दोन दिवसांत राज्य शासनाला सादर करण्याची शक्यता आहे. अहवालानंतरच या घटनेतील दोषी कोण, याची माहिती मिळू शकेल.

‘सीएम’नी चौकशी समितीचे अध्यक्ष बदलले
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घटनेच्या दुसऱ्या दिवशी भंडारा येथे भेट दिली असता, त्यांनी आरोग्य संचालक साधना तायडे यांना चौकशी समितीचे अध्यक्ष केल्याचे घोषित केले होते. मात्र, त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भंडाऱ्यात आले. त्यांनी तायडे यांची अध्यक्षपदावरून उचलबांगडी करून त्यांच्याऐवजी नागपूरचे विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार यांना चौकशी समितीचे अध्यक्ष बनवले.

फॉरेन्सिक पथक दाखल
या जळीतकांडात १० बालकांचा बळी गेला. या समितीच्या माध्यमातून चौकशी सुरू झाली आहे. नागपूर येथून पोलिसांचे एक फॉरेन्सिक पथक भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात सकाळी दाखल झाले. या पथकाने शिशू केअर केंद्रातील साहित्याची पाहणी करून काही साहित्य तपासणीकरिता सोबत नेल्याचीही माहिती आहे.

अग्निशमनचे मॉक ड्रिल
आगीनंतर भंडारा नगरपालिकेचे अग्निशमन दल तातडीने रुग्णालयात दाखल झाले होते. या चौकशी समितीने अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना दुर्घटना घडलेल्या कक्षात मॉक ड्रिल करायला लावून त्यांनी केलेल्या सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत माहिती घेतली

बातम्या आणखी आहेत...