आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मध्यरात्री बिबट्याची धुडगूस:सात मेंढ्या मारल्या; चंद्रपूर जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्ष पुन्हा चर्चेत

नागपूर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपीपरी तालुक्यातील पोडसा येथे शनिवारी मध्यरात्री बिबट्याने गोठ्यात शिरून सात मेढ्या मारल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने चंद्रपूर जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्ष पुन्हा चर्चेत आला आहे. वनखात्याने संबंधित शेतकऱ्याला नुकसानभरपाई देण्याची मागणी होत आहे.

पोडसा हे गाव महाराष्ट्र व तेलंगणा राज्याच्या सीमेवर वसले आहे. ह्या गावाला निसर्गाचे भरभरून देणे लाभले असून गावाच्या एका बाजूला विस्तीर्ण पात्र असलेली वर्धा नदी तर दुसरीकडे घनदाट जंगल त्यामुळे येथील निसर्गसौंदर्य खुलून दिसते. मात्र ह्या सोबतच हिंस्त्र वन्य जीवांच्या भीतीची एक किनार व जंगली प्राण्यांच्या शेतावरील धाडीची धास्तीही येथे आहे.

घटना वारंवार घडतात

मानव व वन्यजीव संघर्ष चंद्रपूर जिल्ह्यात नवा नाही. वाढती लोकसंख्या, गाव तसेच शहरांचा होणारा विस्तार, अवैध जंगलतोड ह्यामुळे वन्यजीवांच्या नैसर्गिक अधिवासाला अडचण निर्माण होत असल्याने तसेच वन्यप्राण्यांच्या अवैध शिकारीमुळे जंगलातील हिंस्त्र पशुंना कमी पडणारी शिकार ह्या कारणांमुळे आपल्या खाद्याच्या शोधात श्वापदे नजीकच्या गावांत अथवा शहरांत शिरून पाळीव प्राणी अथवा मानवावर हल्ला करून आपले पोट भरत असल्याच्या घटना वारंवार घडतात.

ओरडण्याचा आला आवाज

सध्या शेतीचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे जंगलातील तृणभक्षी प्राणी शेतात शिरून पिके खाऊन टाकतात. त्यांच्या मागावर हिंस्त्र श्वापदे सुद्धा येतात. असाच प्रकार पुन्हा एकदा गावकऱ्यांना अनुभवावा लागला. ऐन मध्यरात्री पत्रू गोंधळी ह्यांना आपल्या गोठ्यातील शेळ्यांच्या जोराने ओरडण्याचा आवाज ऐकू आला. त्या आवाजाने झोपेतून जागे झालेल्या पत्रू ह्यांनी सावध होऊन गोठ्याकडे धाव घेतली आणि आतले दृष्य पाहून ते पुरते हादरले.

नुकसान भरपाईची मागणी

बिथरलेल्या बिबट्याने तब्बल सात मेंढ्यांना मारून टाकले. तर सहा मेंढ्या गंभीर जखमी झाल्या. अखेर पत्रूने आरडाओरड करताच शेजारी जागे झाले व सर्वांनी मिळून त्या बिबट्याला जंगलात पिटाळून लावले. मात्र तोपर्यंत पत्रू गोंधळी ह्याचे मोठे नुकसान झाले. वनविभागाने तत्काळ कारवाई करीत पत्रूला भरपाई द्यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...