आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यानंतर भाजपकडून प्रतिहल्ले:यापुढेही मला कोणी संपवू शकणार नाहीत : फडणवीस

नागपूर8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वर्ष २०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांनी मला संपवण्याचा प्रयत्न केला. केवळ एकट्यानेच नव्हे तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोबत घेऊन तिघांनी मिळून एकत्रितपणे अडीच वर्षे मला संपवण्याचा प्रयत्न केला. पण संपवू शकले नाहीत आणि यापुढेही संपवू शकणार नाहीत, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे व महाविकास आघाडीला सुनावले.

या दोघांतील वाद दसऱ्यापर्यंत आता कुठले वळण घेतो, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. देवेंद्र फडणवीसांची शेवटची निवडणूक आहे, असेही ठाकरे म्हणाले होते. त्यावर ‘मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो तकदीर मे लिखा होता है,’ अशा शब्दांत फडणवीस यांनी ठाकरे यांना उत्तर दिले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी गोरेगाव येथील नेस्को मैदानात घेतलेल्या मेळाव्यात भाजपसह शिंदे गटाला लक्ष्य केले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हिंमत असेल तर महिनाभरात पालिका आणि विधानसभा निवडणूक घेऊन दाखवावी, असे थेट आव्हान दिले. त्यानंतर भाजपकडूनही प्रतिहल्ले करण्यात येत आहेत.

सध्या भाजप आणि शिवसेनेतील वाद चांगलाच पेटला आहे. दोन्ही पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. दोन्ही बाजूने वार पलटवार सुरू आहे. उद्धव ठाकरे यांनी भाजपची परत एकदा कमळाबाई म्हणत टिंगल केली आहे. रंगाबिल्ला, मिंधे, टरबूज, १५२ कुळे, मुन्नाभाई, अशी टीकेची झोड ठाकरे यांनी उठवली. यामुळे भाजप गोटातही अस्वस्थता आहे.

उद्धव ठाकरेंचे भाषण निराशेचे अरण्यरुदन उद्धव ठाकरे यांचे कालचे भाषण म्हणजे निराशेचे अरण्यरुदन होते. आम्ही कायदेशीररीत्या निवडून आलो आहोत. मात्र आमच्यासोबत निवडून येऊन आमच्या पाठीत खंजीर खुपसला, त्यावेळी राजीनामे का दिले नाहीत. त्यावेळी निवडणुका का घेतल्या नाही, असा त्यांना माझा प्रश्न आहे. शिवसेना मोदींचे छायाचित्र लावून भाजपसोबत निवडून आली होती. हिंमत होती तर त्यावेळी राजीनामे देऊन निवडून यायचे असते व काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत जायचे असते. म्हणून त्यांचे कालचे भाषण नैराश्यातून होते, अशी टीका फडणवीसांनी केली.