आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे नागपुरात आहेत. यावेळी फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला. दरम्यान त्यांनी सामना अग्रलेखावरुन शिवसेनेला टोला लगावला आहे. 'अर्थसंकल्पीय अधिवेशनात आम्ही कोविड, वीज, शेती अशा बऱ्याच मुद्द्यांवर बोललो, त्यांना मात्र हे जनहीताचे मुद्दे दिसले नाही. त्यांना फक्त टोचणारे आणि बोचणारे मुद्दे दिसले. मात्र आजच्या सामनाच्या अग्रलेखामुळे कळले की घाव वर्मी बसला आहे'
अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडले आहे मात्र या अधिवेशनाच्या निमित्ताने शिवसेना आणि भाजप यांच्यात खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. आज शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेकडून भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे. आता देवेंद्र फडणवीस यांनी सामनाच्या अग्रलेखातून केलेल्या टिकेला प्रत्तुत्तर दिले आहे.
घाव वर्मी बसला आहे
'अधिवेशनात काहीच फलित नाही, सर्वात महत्वाचे की विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राची निराशा झालेली आहे. जनहिताचे मुद्दे उचलणे ही आमची जबाबदारी आहे तशीच ती वृत्तपत्रांचीदेखील जबाबदारी आहे. आम्ही वीजेबद्दल, शेतकरी, कोविडच्या मुद्द्यावर चर्चा केली. पण त्यांना जनहिताचे मुद्दे दिसलेले नाहीत. त्यांना केवळ टोचणारे आणि बोचणारे मुद्दे दिसले. असा अग्रलेख आला यामुळे घाव वर्मी बसला आहे हे लक्षात आले आहे' असा टोला फडणवीसांनी शिवसेनेला लगावला आहे.
सरकारने लबाडी केलेली आहे
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 'वीजेच्या मुद्द्यावरुन सरकारने लबाडी केलेली आहे. ज्या प्रकारे पहिल्या दिवशी अधिवेशनामध्ये त्यांनी आश्वासन दिले की वीज कापणार नाही. मात्र अखेरच्या दिवशी अगदी विसंगत स्टेटमेंट केले. हे केवळ अधिवेशन काढायचे म्हणून केले' अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली आहे.
सामनामध्ये काय लिहिले होते?
'लोकांच्या जगण्या–मरण्याचे अनेक प्रश्न सतावत आहेत. त्यावर विधिमंडळात चर्चा घडवून विरोधी पक्षनेत्यांनी सरकारला धारेवर धरले असते तर उत्तमच झाले असते, पण एका संशयास्पद मृत्यूचा धड तपास होऊ न देता आदळआपट करणे हे लोकशाहीचे विकृत रूप आहे. अर्थसंकल्पातील तरतुदींवर चांगली चर्चा करता आली असती व विरोधी पक्षनेत्यांना त्यांचा अनुभव पणास लावता आला असता. शिक्षण, कायदा–सुव्यवस्थेचे, इतरही काही प्रश्न आहेत. अर्थसंकल्पात एक लाख कोटीची महसुली तूट आहे. असे एक ना अनेक प्रश्न राज्याला भेडसावत आहेत. त्यावर बोलायचे नाही. लोकांच्या जीवनाचे प्रश्न महत्त्वाचे आहेत हे विरोधी पक्षाला कधी कळणार?' असा सवाल शिवसेनेने सामना अग्रलेखातून केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.