आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी असताना काँग्रेस नेत्यांनी कमावलेल्या काळ्या पैशातून ‘भारत जोडो यात्रे’ चा खर्च करण्यात येत असल्याची घणाघाती टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर विमानतळावर माध्यमांशी बोलताना केली. यात्रेपासून काँग्रेसचा मूळ कार्यकर्ता दूर असून दिवसागणिक मोठ्या संख्येत काँग्रेस कार्यकर्ते भाजपात प्रवेश करीत आहेत, असेही ते म्हणाले.
काय म्हणाले बावनकुळे?
राहुल गांधी यांची यात्रा ही नेत्यांची मुले काँग्रेसमध्ये नेते व्हावे यासाठी काढली आहे. नेत्यांचे पूत्र युवक काँग्रेसच्या माध्यमातून भारत जोडो यात्रेसाठी भ्रष्टाचारातून कमाविलेला पैसा खर्च करीत आहेत. ही यात्रा काँग्रेसच्या मूळ कार्यकर्त्यांच्या कोणत्याही कामाची नाही. 2024 पर्यंत महाविकास आघाडीत अनेक मोठे बॉम्बस्फोट होतील. यावर अनेकांना आश्चर्य होईल. येत्या दीड वर्षांत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा, राष्ट्रवादी व काँग्रेसचा कार्यकर्ता नाराज आहे. हे नाराज कार्यकर्ते भाजपा व बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश करतील असेही भाकित त्यांनी वर्तविले. मागील अडीच वर्षांत उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडून काँग्रेस व राष्ट्रवादीचा अजेंडा राबविला.
महिलांचा सन्मान झाला पाहिजे
महिलांचा सन्मान प्रत्येकाने केला पाहिजे. ही महाराष्ट्राची संस्कृती जपणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. सरकारमधील मंत्र्यांनी कुणावरही टिका टिप्पणी करू नये. अब्दुल सत्तारांच्या प्रकरणात मुख्यमंत्री लक्ष घालतील अशी अपेक्षा आहे. पवार कुटुंबावर आरोप करण्यासाठी अनेक जागा आहेत. पण महिलेच्या बाबतीत जे वक्तव्य केले गेले, खासकरून खासदार सुप्रिया सुळेंच्या बाबतीत जे बोलले गेले आहे, असे कुणीही बोलू नये. पण राष्ट्रवादी या बाबती करीत असलेला जनआक्रोश योग्य नाही असे बावनकुळे म्हणाले.
महाराष्ट्राची राजकीय संस्कृती जपा
प्रत्येक नेत्याने महिला नेत्यांच्या बाबतीत बोलताना विचारपूर्वक बोलले पाहिजे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महिलांचा अपमान झाल्याची 50 प्रकरणे सांगता येतील. महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांच्या नेत्यांनी भाजपच्या महिला नेत्यांवर आणि एकंदरीत महिलांच्या बाबतीत आक्षेपार्ह टिका टिप्पणी केली आहे. जेलमध्ये असलेले संजय राऊतसुद्धा आक्षेपार्ह बोलले आहेत. पण जास्त मागे जाऊन विचार करू नये. महाराष्ट्राची संस्कृती जपली पाहिजे.
अंधारेंनी स्वत:ची बौद्धिक उंची तपासावी
सुषमा अंधारें सुपारी घेतल्यासारख्या बोलतात. त्यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत कुठेही बरोबरी होऊ शकते का? असा सवाल बावनकुळेंनी केला. सुषमा अंधारेंना एवढेच सांगणे आहे की, त्यांच्या राजकीय प्रवासात त्यांनी जपून बोलावे ज्यांच्याबद्दल त्या बोलतात, त्या नेत्याची आणि स्वतःची बौद्धिक उंची त्यांनी तपासून घ्यावी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.