आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूर:पश्चिम विदर्भातील नेतृत्वाची पोकळी भरुन काढण्याचा भाजपचा प्रयत्न

नागपूर/ अतुल पेठकर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर भाऊसाहेब पांडुंरग फुंडकर यांच्या नंतर पश्चिम विदर्भात असलेली कुणबी-मराठा नेतृत्वाची जागा भरून काढण्याकरता भाजपने माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांना राज्यसभेची उमेदवारी दिल्याचे बोलले जाते. तर श्रीकांत भारतीय यांच्यावर विधान परिषद उमेदवारीचे ‘तुषार’ सिंचन करत लहान भावाला शांत करण्याचा प्रयत्न दिसत आहे.अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांना भाजपने केंद्रीय राज्यमंत्री केले. पण, धोत्रे मिळालेल्या संधीचे सोने करू शकले नाही. परिणामी त्यांचे मंत्रिपद गेले. पश्चिम विदर्भात भाऊसाहेब फुंडकर यांच्या नंतर भाजपकडे मराठा कुणबी नेतृत्व नव्हते, ती कमतरता बोंडेंच्या उमेदवारीने भरून काढली. तर दुसरीकडे वरूड मोर्शी हा मतदारसंघही रिकामा करून घेतला. कारण बोंडे राज्यात राहिले असते तर या मतदारसंघाचे प्रबळ दावेदार राहिले असते. भाऊसाहेब फुंडकरांनाही राज्यसभेवर पाठवण्यात आले होते, हे लक्षात घेणे क्रमप्राप्त आहे. एकेकाळी अरूण अडसडही जोशात होते. आता त्यांचा मुलगा आमदार आहे. या पार्श्वभूमीवर डाॅ. अनिल बोंडे यांना राज्यसभा का देण्यात आली, हे सहज लक्षात यावे.श्रीकांत भारतीय यांचे लहान बंधू तुषार भारतीय बडनेरामधून २०१४ मध्ये आमदारकीसाठी लढले होते. सध्या ते नगरसेवक आहेत. विधान परिषदेवर त्यांचाही तसा दावा होताच. पण, मोठ्या भावाला प्रथम पसंती देण्यात आली. श्रीकांत भारतीय संघाच्या कोट्यातून दिले गेल्याचे दिसते. विधान परिषदेची उमेदवारी दिलेले श्रीकांत भारतीय हे मूळचे अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील. पण राजकीय प्रवासात त्यांचा अमरावती सोबत संबंध त्या तुलनेत कमीच. भाजपचे विदर्भात संघटन मंत्री ते राज्याचे संघटनमंत्री या प्रवासात त्यांच्या राजकीय नकाशावर संपूर्ण महाराष्ट्र होताच आणि सध्याही आहे.

त्यामुळेच राज्यव्यापी असलेल्या या नेतृत्वाचा उपयोग पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांमध्ये करण्याचा भाजपचा अजेंडा दिसत आहे.फडणवीसांचे ओएसडी ते आमदार असा भारतीय यांचा प्रवास आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून अनेक नावे चर्चेत होती. परंतु त्यांना डावलून भाजपने श्रीकांत भारतीय यांना संधी दिली आहे. भारतीय हे भाजपचे प्रदेश सरचिटणीस आहेत. एक अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ते त्यांचे ओएसडी होते. शिवाय राजकीय सल्लागारही आहेत. भाजपच्या अनेक आंदोलनात त्याच बरोबर शिवसेनेवर टीका करणाऱ्या प्रमुख नेत्यांमध्ये श्रीकांत भारतीय यांचे नाव घेतले जाते. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या वॉररूमचे ते प्रमुख होते.पश्चिम विदर्भावर लक्ष केंद्रीत करूनच अमरावतीत राज्यसभा आणि विधान परिषद उमेदवारी दिल्याचे स्पष्ट आहे. अमरावतीला राजकीयदृष्ट्या एवढे महत्व प्राप्त होण्याचे कारण काय? असा प्रश्न पडणे साहजिक आहे. पण, पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भातील भाजपच्या नेतृत्वाचा विचार केला तर पूर्व विदर्भात केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, हंसराज अहिर असे मातब्बर अन् मुरब्बी नेते आहेत.तुलनेत पश्चिम विदर्भात मात्र भाजपच्या नेतृत्वाचा दुष्काळच आहे. अमरावतीत डॉ. अनिल बोंडे, निवेदिता चौधरी, आमदार प्रवीण पोटे, जयंत डेहनकर यवतमाळात मदन येरावार, अकोल्यात गोवर्धन शर्मा, माजी केंद्रीय मंत्री संजय धोत्रे, बुलडाणा आणि वाशीम जिल्ह्यात तर भारतीय जनता पक्षात नेतृत्वाचे नावही आठवत नाही, अशी परिस्थिती आहे. अमरावतीत तर २२ वर्ष आमदारकी मंत्रिपद भूषवलेले जगदीश गुप्ता यांच्या नंतर नेतृत्वाची पोकळीच निर्माण झाली आहे. पश्चिम विदर्भातील या नावांमध्ये डॉ. अनिल बोंडे यांनी मात्र, मागील वर्षभरात नजरेत येईल, अशी राजकीय प्रगती केली. प्रखर हिंदूत्ववादी चेहरा म्हणून डॉ. अनिल बोंडे यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. भाजपवर विरोधकांकडून होणारे हल्ले यशस्वीरित्या परतवून लावले.

बातम्या आणखी आहेत...