आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

भंडारा:जादूटोण्याचा संशय; चौघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, भंडारा जिल्ह्यातील घटना, 24 जणांना अटक

भंडारा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अंगावर पेट्रोल आणि रॉकेल टाकून चौघांनाही जिवंत जाळण्याचा प्रयत्न

जादूटोणा केल्याच्या संशयावरून चौघांवर पेट्रोल आणि रॉकेल टाकून जिवंत जाळून मारण्याचा प्रयत्न केला. ही थरारक घटना तुमसर तालुक्यातील राजापूर येथे मध्यरात्री घडली. याप्रकरणी गोबरवाही पोलिसांनी सात महिलांसह २४ जणांना अटक केली आहे. कुंदन भोजराम गोपाले (४०), ओमप्रकाश मेश्राम (२७), कचरू फत्तू राऊत (६०), मनोहर बळीराम गोटे (७०) या चौघांना जाळून मारण्याचा प्रयत्न केला.

गावातील एक २५ वर्षीय महिला कुंदन गोपाले यांच्या घरी पोहोचली आणि त्याच्या छपरीत बेशुद्ध पडली. यावरून वाद झाला. त्यामुळे ग्रामस्थांनी कुंदनवर जादूटोण्याचा संशय घेतला. याची दखल तंटामुक्त समितीने घेऊन प्रकरण शांत केले. शनिवारी पुन्हा एक २५ वर्षीय महिला कुंदन गोपाले आणि ओमप्रकाश मेश्राम यांच्या घरी गेली. ती त्याच्या घराच्या आवारात बेशुद्ध पडली. यावरून महिलेच्या कुटुंबीयांनी गोपाले आणि मेश्राम यांच्याशी वाद घालून त्यांच्यावर जादूटोणा केल्याचा आरोप केला. हा वाद विकोपाला गेला. त्यामुळे कुंदन गोपाले, ओमप्रकाश मेश्राम, कचरू फत्तू राऊत, मनोहर गोटे हे राजापूर येथील रहिवासी असूनही भीतीपोटी शनिवारीला रात्री उशिरापर्यंत ते गावाबाहेर राहिले. हे चौघेही गावात नसल्याने संतप्त ग्रामस्थ त्यांच्या घरावर धावून गेले आणि कुटुंबीयांना धमकावले.

ही माहिती कुटुंबीयांनी चौघांनाही दिल्यावर ते भीतीपोटी मध्यरात्री गावात पोहोचले. ते गावात दाखल होताच संतप्त जमावाने चौघांचेही कपडे काढून कपड्यांवर पेट्रोल टाकून ते जाळले. लाठ्या-काठ्यांनी मारहाण केली. त्यानंतर त्यांना दोराने बांधून त्यांच्या अंगावर पेट्रोल आणि रॉकेल टाकून चौघांनाही जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच गोबरवाही पोलिस राजपूरला पोहोचल्याने पुढील मोठी दुर्घटना टळली.