आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अन् इन्शाराला मिळाला MBBSमध्ये प्रवेश:जात पडताळणी प्रमाणपत्रामुळे अखेरच्या दिवशी अडचणीत; अधिकाऱ्यांनी दाखवली तत्परता

प्रतिनिधी/नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

प्रशासनातील अधिकाऱ्याने मनावर घेतल्यानंतर सामान्यांची अडलेली कामे तातडीने होऊ शकतात, असा सुखद अनुभव जिल्हा जात पडताळणी अधिकाऱ्यांनी दिला. त्यांच्या पुढाकारामुळे शेवटच्या दिवशी एका मुलीचे एमबीबीएसला अ‌ॅडमिशन झाले.

अखेरच्या दिवशी अडचण

इन्शारा जावेद नदीम या मुस्लिम ओबीसी मुलीला वर्धा येथील मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएससाठी प्रवेश घ्यायचा होता. मात्र, प्रवेशाच्या शेवटच्या दिवशी जात प्रमाणपत्र नसल्याने इन्शाराचा प्रवेश अडचणीत आला. त्यामुळे तिने तातडीने जातप्रमाणपत्र पडताळणी अधिकाऱ्यांकडे धाव घेतली.

काही तासांतच प्रमाणपत्र

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जात वैधता प्रमाणपत्र अधिकारी सुरेंद्र पवार यांनी जात पडताळणी समितीचे अध्यक्ष सचिन कलंत्रे यांचे मार्गदर्शन घेतले. त्यांनी तातडीने मदत करण्याचे निर्देश दिल्यावर आपले सहकारी संशोधन अधिकारी आशा कव्हाळे यांच्या मदतीने काही तासांतच मुलीकडून अर्ज घेऊन जात पडताळणी प्रमाणपत्र तयार केले.

अधिकाऱ्यांचे कौतुक

इन्शाराचा प्रवेश जात पडताळणी प्रमाणपत्र नसल्यामुळे अडला होता. तिच्या प्रवेशाचा शेवटचा दिवस होता. मात्र त्याच दिवशी अर्ज घेऊन त्याच दिवशी 24 तासाच्या आत अर्ज निकाली काढण्याचे कार्य सुरेंद्र पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. मुलीला एकाच दिवसात प्रमाणपत्र मिळाल्याने तिचा प्रवेश सुकर झाला आहे. अल्पसंख्यांक समुदायातील एका मुलीला उच्च शिक्षणात आलेला अडसर अखेरच्या दिवशी दूर करण्याचे दायित्व घेतल्याबद्दल या अधिकाऱ्यांचे आता कौतुक होत आहे.

तातडीने पडताळणी करून घ्यावी

दरम्यान, जात पडताळणीची प्रक्रिया अतिशय सुलभ असून विद्यार्थ्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत विनाकारण पडताळणी प्रलंबित ठेवू नये. तातडीने पडताळणी करून घ्यावी, असे आवाहन सुरेंद्र पवार यांनी केले आहे. जात पडताळणी करताना दलालांच्या भूलथापांना बळी पडू नये. काही अडचण असल्यास कार्यालयात संपर्क साधावा. कारण दलाल बंद पडलेल्या आणि शिक्षण विभागाने परवाना रद्द केलेल्या शाळांची बनावट प्रमाणपत्रे देतात. त्यामुळे प्रमाणपत्र मिळताना अडचणी निर्माण होतात. जात पडताळणी कार्यालयात कोणती कागदपत्रे हवीत याची यादी लागलेली आहे. ती पाहून तसा अर्ज करावा, असे आवाहन पवार यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...