आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिलाच प्रयोग:​​​​​​​पीपीसीपी तंत्रज्ञानाच्या वापराने नागपुरात तयार होतोय सिमेंट रोड; सिमेंट काँक्रीट पद्धतीमुळे रस्तेबांधणीला होतो विलंब

नागपूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • असे आहेत पीपीसीपी तंत्रज्ञानाचे फायदे

सिमेंट रस्ता बांधकामात घनदाट वस्त्यांमध्ये अनेक अडचणी येतात. अरुंद रस्त्यांमुळे तिथे सिमेंट रस्ता बांधणे कठीण जाते. त्यावर उपाय म्हणून प्रेस्ट्रेस प्रिकास्ट काँक्रीट पॅनेल म्हणजेच पीपीसीपी या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून नागपुरात प्रथमच सिमेंट रोडचे बांधकाम करण्यात येत आहे. नागपुरातील राजीवनगर झेंडा चौक ते इसासनीदरम्यानचा सिमेंट काँक्रीट रस्ता बांधण्यात येत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या रस्ते बांधकामाला भेट देऊन पाहणी केली. या कामाचे तांत्रिक सल्लागार मिलिंद दिग्रजकर यांचे गडकरींनी कौतुक केले.

महाराष्ट्रात सद्य:स्थितीत विविध रस्त्यांची बांधकामे पारंपरिक सिमेंट काँक्रीट पध्दतीने होत आहेत. यामुळे रस्ता बांधकामाला बराच वेळ लागतो. या कारणास्तव वाहतूक खोळंबते. तसेच अपघाताचे प्रमाणसुध्दा वाढते. याशिवाय रस्त्याची तरई योग्य रीतीने होत नसल्यामुळे बऱ्याच वेळी रस्त्याची गुणवत्ता खराब होण्याची शक्यता असते. या कारणास्तव नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून रस्त्याचे बांधकाम केले जात आहे.

राजीवनगर- झेंडा चौक ते इसासनी रस्त्यामधील ४८० मी. लांबीच्या दाट लोकवस्तीच्या भागात नवीन पीपीसीपी तंत्रज्ञान वापरून रस्त्याचे बांधकाम करण्यात आले. हा रस्ता अतिशय अरुंद, गर्दी व दाट लोकवस्तीच्या क्षेत्रात असल्यामुळे पारंपरिक सिमेंट काँक्रीट पध्दतीने बांधकाम करणे शक्य नव्हते. नवीन तंत्रज्ञानामध्ये फॅक्टरीत २०० मिमी जाडीचे व २.७५ मी. x ३.५० मी. आकारमानाचे काँक्रीट पॅनेल तयार केले जाते. या नवीन बांधकाम प्रणालीमुळे रस्ता बांधकामादरम्यान वाहतुकीकरिता होणारा त्रास टाळता येतो. कमी जागेअभावी बांधकाम करताना येणाऱ्या बऱ्याच अडचणीवर मात करता येते. या नवीन तंत्रज्ञानाने शहरी व दाट वस्तीच्या भागात जलदगतीने रस्ते पूर्ण करणे शक्य होईल. पीपीसीपी तंत्रज्ञानाचा वापर करून नागपुरात तयार होतोय सिमेंट रोड.

असे आहेत पीपीसीपी तंत्रज्ञानाचे फायदे
हे डांबरी पृष्ठभागात सरळ ठेवता येतात. पीपीसीपीचे बांधकाम कोणत्याही हवामानात करता येऊ शकते. पारंपरिक सिमेंट काँक्रीट रस्त्यांच्या तुलनेत खूप कमी इंधन लागते. पीपीसीबीचे तरई हे पूर्णत: नियंत्रित पद्धतीने केल्यामुळे अतिरिक्त वेळ लागत नाही, रस्त्याचे आयुष्य वाढते, पारंपरिक सिमेंट काँक्रीट रस्त्यांच्या तुलनेत पीपीसीपीची जाडी ३० ते ४०% कमी असल्यामुळे रसत्याची कालांतराने दुरुस्ती करण्यास सहजतेने शक्य होते. पारंपरिक सिमेंट काँक्रीट रस्त्यांच्या तुलनेत पीपीसीपीची किंमत कमी असल्यामुळे प्रकल्पाचा किमतीमध्ये बचत होते.

बातम्या आणखी आहेत...