आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:बाजार समिती निवडणुकीत भाजपसोबतची युती नडली; चंद्रपूर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष प्रकाश देवतळेंची हकालपट्टी

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पक्षादेश झुगारून चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपशी उघड युती करून निवडणूक लढल्याचा फटका काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांना बसला. खासदार बाळू धानोरकर गटाचा पराभव केल्याच्या आनंदात ढोलताशा व गुलालाची उधळण करत भाजप जिल्हाध्यक्षांसोबत डान्स करणारे देवतळे यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. बाजार समितीच्या निवडणुकीत देवतळे यांनी पक्ष विरोधी कारवाई केली म्हणून त्यांना पद गमवावे लागले आहे.

लोकशाही व संविधान वाचविण्यासाठी तसेच सर्वसामान्य जनतेच्या पैशावर डल्ला मारणाऱ्या अदानी महाघोटाळ्याच्या आरोपासंदर्भात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उठविलेला आवाज भाजपने हुकूमशाही करीत दडपण्याचा प्रयत्न केला. राहुल गांधी भाजपा विरोधात थेट संघर्ष करत असताना स्थानिक पातळीवरील कोणत्याही निवडणुकीमध्ये भाजप किंवा त्यांच्यासोबत सत्तेत सहभागी असलेल्या कोणत्याही पक्षासोबत आघाडी करू नये अशा स्पष्ट सूचना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्या होत्या.

मात्र त्या नंतरही नुकत्याच झालेल्या चंद्रपूर कृषी कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये काँग्रेस अध्यक्ष देवतळे यांनी उघड उघड भाजपसोबत हातमिळवणी करून प्रत्यक्ष सहभाग घेतला, ही बाब पक्षशिस्तीच्या विरोधातली असून प्रदेश काँग्रेसच्या आदेशाला न जुमानणारी आहे.

आपले हे कृत्य पक्षविरोधी असल्याने सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश गेला आहे. त्यामुळे आपल्याला चंद्रपूर ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदावरून कार्यमुक्त करण्यात येत आहे आणि आपला पदाचा प्रभार पुढील आदेशापर्यंत चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश तिवारी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे असे कारण देवतळे यांना देण्यात आले आहे.

दरम्यान राजुरा बाजार समितीत काँग्रेस आमदार सुभाष धोटे यांनी भाजपासोबत युती केली. त्यामुळे काँग्रेस त्यांच्यावर काय कारवाई करते का याकडेही लक्ष लागले आहे. तर भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी काँग्रेससोबत युती केली. त्यामुळे भाजपा भोंगळे यांच्यावर काय कारवाई करते का, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.