आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविधिमंडळाचे सोमवार, १९ डिसेंबरपासून सुरू होणारे हिवाळी अधिवेशन वादळी होण्याचे संकेत विरोधकांनी दिले आहेत. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारच्या चहापानावर बहिष्कार घालत विरोधकांनी सडकून टीका केली. राज्यातील समस्या सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांना वेळ नाही, मात्र इतर गोष्टी करण्यासाठी त्यांच्याकडे वेळ आहे. त्यामुळे यातून राज्याच्या मुख्यमंत्र्याची संवेदना संपल्याचे स्पष्ट दिसत आहे, असा टोला अजित पवार यांनी लगावला.
ते म्हणाले, सत्ताधारी ईडी सरकारमधील विसंवाद दररोज पाहायला मिळत आहे. दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. जनतेच्या मनातील शिंदे-फडणवीस सरकारबद्दलचा विश्वास संपुष्टात आला आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्र्यांसह राज्यपाल कोश्यारींपासून चंद्रकांत पाटील यांच्यापर्यंत भाजप नेत्यांची बेताल वक्तव्ये, राज्यातील उद्याेगांची पळवापळवी, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत वादग्रस्त विधाने करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ते प्रसाद लाड, आंतरधर्मीय विवाह समन्वय समिती, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी मवाळ धोरण स्वीकारणाऱ्या सरकारचा निषेध म्हणून चहापानावर बहिष्कार घालत असल्याचे सांगत अजित पवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला.
महापुरुषांचा अपमान सहन केला जाणार नाही. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा घेतल्याशिवाय विरोधक स्वस्थ बसणार नाहीत. या वक्तव्यांमागील मास्टरमाइंड शोधला पाहिजे, अशी मागणी पवारांनी केली.
मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे अरोप, मात्र नैतिकता नाही : दानवे
शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला दरही दिला जात नाही, त्यांच्या खात्यात दिलेल्या मदतीचे पैसे जमा झालेले नाही. शेतकऱ्यांचे सरकार असल्याचा केवळ आव आणला जात आहे. राज्यातील मंत्र्यांवर भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांचे आरोप झाले. पण या मंत्र्यांमध्ये नैतिकता उरली आहे की नाही, असा प्रश्न विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला. भाजप- बाळासाहेबांची शिवसेनेच्या ईडी सरकारच्या अपयशावर विरोधी पक्षांनी बोट ठेवले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.