आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुख्यमंत्र्यांचा दौरा:घोडाझरी शाखा कालव्याच्या कामाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी, काम वेळेत पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

चंद्रपूर12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड-ब्रम्हपुरी रस्त्यावरील गोसेखुर्द प्रकल्पातील घोडाझरी शाखा कालवा येथे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी कालव्याच्या चालू असलेल्या कामाला आज भेट देऊन कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्यात.

याप्रसंगी त्यांच्यासोबत आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, अप्पर मुख्य सचीव विजय कुमार गौतम, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, गोसेखुर्द प्रकल्पाचे मुख्य अभियंता वेमुल कोंडा, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता श्री कपोले, अपर जिल्हाधिकारी श्रीमती विद्युत वरखेडकर, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, कार्यकारी अभियंता संदीप सातपुते, गोसेखुर्द प्रकल्पाचे अधिक्षक अभियंता अ.का देसाई, घोडाझरी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता पु. म. फाळके, अधीक्षक अभियंता काटपल्लीवार उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्र्यानी प्रकल्पाच्या कामाकडे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी लक्ष द्यावे आणि गरज पडल्यास निधीची मागणी करावी असे सांगितले. प्रकल्पाची किंमत कोणत्याही परिस्थितीत वाढणार नाही आणि कामे वेळेत पूर्ण होईल याची काळजी अधिकाऱ्यांनी घ्यावी, असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. यावेळी गोसेखुर्द प्रकल्पाचे मुख्य अभियंता वेमुल कोंडा यांनी मुख्यमंत्र्यांना घोडाझरी शाखा कालव्याविषयी माहिती दिली.

घोडाझरी शाखा कालवा हा गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाचा घटक आहे. गोसेखुर्द प्रकल्पाच्या उजव्या कालव्याच्या 36.76 किमी वरून घोडाझरी शाखा कालवा उगमीत असून एकूण लांबी 55 किमी आहे. घोडाझरी शाखा कालव्याच्या लाभ क्षेत्रात चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण 5 तालुके(ब्रह्मपुरी, नागभीड सिंदेवाही, मुल व सावली ) येतात. यातील 19 गावात 29 हजार 61 हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार आहे. डिसेंबर 2021 मध्ये पूर्ण होणाऱ्या काही कामांमुळे 9 हजार हेक्टर क्षेत्रात शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ होणार आहे. उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी निधीची आवश्यकता असून सदर निधी लवकर मिळाल्यास डिसेंबर 2023 पर्यंत या शाखा कालव्याचे काम पूर्ण होऊन शेतकऱ्यांना पूर्ण क्षमतेने सिंचनासाठी पाणी उपलब्ध होईल, अशी माहिती वेमुल कोंडा यांनी दिली.

तत्पूर्वी ब्रम्हपुरी येथील शासकीय तंत्रनिकेतनच्या मैदानावर तयार करण्यात आलेल्या हेलिपॅडवर मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे आगमन झाले. तिथे चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार ,अप्पर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डीले यांनी पुष्पगुच्छ देऊन मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser