आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड-ब्रह्मपुरी रस्त्यावरील गोसेखुर्द प्रकल्पातील घोडाझरी शाखा कालव्याची पाहणी करून हेलिपॅडकडे परतताना संतप्त प्रकल्पग्रस्तांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची गाडी अडवून आपल्या व्यथा मांडल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली. मुख्यमंत्र्यांचे खासगी स्वीय सहायक व ओएसडी मिलिंद नार्वेकर यांनाही प्रकल्पग्रस्त ऐकत नसल्याचे पाहून मुख्यमंत्र्यांनी स्वत: गाडीतून उतरून निवेदन स्वीकारले.
कालव्याची पाहणी करून मुख्यमंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा हेलिपॅडकडे जाण्यासाठी निघाला असता कोपऱ्यावरील प्रकल्पग्रस्तांनी ताफा अडवला. मुख्यमंत्र्यांचे ओएसडी मिलिंद नार्वेकर यांनी संतप्त मोर्चेकऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. ‘१५ वर्षांपासून एक थेंबही पाणी मिळाले नाही. आतापर्यंत ३१ हजार कोटी रुपये खर्च झाले, पण शेतकऱ्यांना काहीही फायदा झालेला नाही,’ असे प्रकल्पग्रस्तांनी संतप्त सुरात सांगितले. त्या वेळी नार्वेकरांनी ‘निवेदन दिले आहे. ताफा पुढे जाऊ द्या,’ असे त्यांना समजावून पाहिले. प्रकल्पग्रस्तांच्या संतप्त भावना पाहता मुख्यमंत्र्यांनी स्वत: गाडीतून उतरून त्यांचे निवेदन स्वीकारत म्हणणे ऐकून घेतले. पाच मिनिटे मुख्यमंत्री तिथे होते.
माहिती विभागाची साखरपेरणी : कडेकोट बंदोबस्त असतानाही प्रकल्पग्रस्तांनी मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवून आपल्या व्यथा मांडल्याने भांबावलेल्या माहिती विभागाने याप्रकरणी सारवासारव करीत मुख्यमंत्री स्वत:च प्रकल्पग्रस्तांना सामोरे गेल्याची बातमी पेरली. निवेदन घेऊन वाट पाहत असलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना पाहून मुख्यमंत्री स्वत: गाडीतून उतरत त्यांच्यात मिसळले, अशी साखरपेरणी करणारी बातमी पाठवली.
गोसेखुर्द प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण करणार
राज्यात सुरू असलेल्या विविध विकासकामांच्या आढाव्याची सुरुवात आपण विदर्भापासून केली असून, गोसेखुर्द हा महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय प्रकल्प येत्या तीन वर्षांत पूर्ण करण्यात येईल. त्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही देतानाच प्रकल्पामुळे बाधित झालेल्या नागरिकांचे योग्य पुनर्वसन व्हावे तसेच पुनर्वसन पूर्ण झाल्यावर प्रकल्पग्रस्तांच्या रोजीरोटीचा प्रश्न सोडवण्यासाठी रोजगार निर्मितीचे प्रकल्प सुरू करण्याला प्राधान्य द्यावे, असेही ठाकरे यांनी सांगितले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.