आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायंकाळी होणारा नियोजित बालविवाह दिवसा थांबविला:गडचिरोलीतील घटनेने उडाली खळबळ

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अक्षयतृतीया, तुळशी विवाह तसेच उन्हाळ्यात राज्यात बालविवाह लावून दिले जातात. कोरोना काळात बालविवाह लावून देण्याचे प्रमाण खूपच वाढले होते. गडचिरोलीसारख्या आदिवासी भागातही बालविवाह लावण्याचे प्रकार घडतात. गडचिरोली जिल्ह्यातील मूलचेरा तालुक्यात होणारा एक बालविवाह जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय व जिल्हा बाल संरक्षण कक्षाने राेखला.

मुलचेरा तालुक्यात एक बालविवाह होत असल्याची गोपनीय माहिती मिळताच जिल्हा बाल संरक्षण टिमने बालविवाह रोखण्याकरीता विवाहस्थळ गाव गाठले व बालक 18 वर्षाखालील असल्याची खात्री करून सर्व माहितीची शहानिशा झाल्यानंतर गावातील सरपंच पवन मंडल, पोलिस पाटिल नागेन सेन, अंगणवाडी सेविका दिपू सरकार आणि अमियो सेन यांच्या समक्ष मुलाचे घर गाठून विवाह रोखला.

पत्र लिहून हमी

पहिले वधू वरांचे आई वडील व उपस्थित नातेवाईकांना बालविवाह केल्यास होणाऱ्या दुष्परिणामाबाबत माहिती दिली. वधुचे वय 18 आणि वराचे 21 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय त्यांचे लग्न लावून देणार नाही, असा जबाब नोंदविण्यात आला. वर पक्ष व वधू पक्षाकडून हमी पत्र लिहून घेतले व बालिकेचे समुपदेशन करण्यात आले.

यांनी केली कारवाई

विवाह रोखण्याची कार्यवाही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अविनाश गुरनुले, बाल संरक्षण अधिकारी प्रियंका आसुटकर, सामाजिक कार्यकर्ता जयंत जथाडे, संरक्षण अधिकारी महेंद्र मारर्गोंनवार, सामाजिक कार्यकर्ते तनोज ढवंगाये, क्षेत्र कार्यकर्ता रवींद्र बंडावार, लेखापाल पूजा धमाले यांनी केली.

महिला आयोगाकडे तक्रार

बाल विवाहाची सद्यस्थिती पाहता नवीन नियमानुसार महाराष्ट्रातील बालविवाह रोखण्यासाठी ठोस उपाय योजना करणे आवश्यक आहे. त्यामुळे महाराष्ट्रात बालविवाह होणाऱ्या ठिकाणी तेथील स्थानिक लोकप्रतिनिधी उदाहरणार्थ सरपंच तत्सम प्रतिनिधी आणि विवाह नोंदणी अधिकारी म्हणजे ग्रामसेवक, तलाठी किंवा तत्सम अधिकारी यांची जबाबदारी निश्चित कारावी. त्यानंतर अशा प्रकारची घटना घडली व त्याची दोष सिद्धी झाल्यास त्यांचे पद रद्द करण्यात यावे. ही दुरुस्ती बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 मध्ये करावी, अशी शिफारस राज्य महिला आयोगाच्या तत्कालीन अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले होते.

बातम्या आणखी आहेत...