आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बाल दिन विशेष:नातवंडांसोबत खेळताना मीही लहान होतो : नितीन गडकरी

नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री | नागपूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आई आणि शिक्षकांमुळे जगणे साकारल्याची भावना, शाळेतील आठवणींनाही दिला उजाळा

१४ नाेव्हेंबर ही पंडित नेहरू यांची जयंती बाल दिन म्हणून साजरी केली जाते. चाचा नेहरूंना लहान मुले खूप आवडत. आज देशात रोडकरी-पुलकरी म्हणून प्रसिद्ध असलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही मुलांचा लळा. अत्यंत धकाधकीच्या वेळापत्रकात गुरफटलेले गडकरी आतासुद्धा नातवंडांसोबत खेळताना स्वत:च्या बालपणात रमतात. आजही ते बालपण विसरलेले नाहीत. बाल दिनानिमित्त आठवणींना दिलेला उजाळा त्यांच्याच शब्दांत....

लहानपण देगा देवा । मुंगी साखरेचा रवा ।।

ऐरावत रत्न थोर । त्यासी अंकुशाचा मार ।।

ज्याचे अंगी मोठेपण । तया यातना कठीण ।।

तुका म्हणे जाण । व्हावे लहानाहूनि लहान ।।

संत तुकारामांचा हा अभंग मागे वळून जेव्हा केव्हा मी माझ्या बालपणाकडे पाहतो तेव्हा ताे हमखास आठवतो. निरागस बालपण खूप सुखाचे असते. नातवंडांसोबत खेळताना मीही नकळत लहान होतो. जुने दिवसांचे काही कवडसे हाती लागतात. ते मुठीत पकडण्याचा प्रयत्न करतो. बालपण म्हटले की, पहिल्यांदा आठवते ती माझी आई - भानूताई. आई, शाळेतील व संघातील शिक्षकांनी माझ्या जीवनाला आकार दिला.

माझे बालपण नागपूरच्या महाल भागात गेले. पहिली ते चौथीचे शिक्षण लोकांची शाळामध्ये झाले. पाचवी ते सातवी नवयुग विद्यालयात शिकलो. त्यानंतर ८ वी ते ११ वीचे शिक्षण नील सिटी हायस्कूलमध्ये घेतले. माझ्या शालेय जीवनातच माझ्यावर साहित्य, वक्तृत्व, संगीत इत्यादी गोष्टींचे संस्कार झाले. माझ्या आईमुळे मी ललित कला विहारच्या कार्यक्रमांना जायचो. ब. मो. पुरंदरे, प्रभावती राजे, करपात्री महाराज, बाळशास्त्री हरदास, विजयराव देशमुख या वक्त्यांना मी शाळकरी वयातच ऐकल्यामुळे वक्तृत्वाचे संस्कार झाले. आमच्या नवयुग विद्यालयात संगीताचे कार्यक्रम होत. टाऊन हॉलमध्येदेखील बरेच कार्यक्रम व्हायचे. त्या कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी आई प्रोत्साहन द्यायची. चांगले ऐकले पाहिजे, चांगले वाचले पाहिजे, असा आईचा आग्रह असे. यामुळे मी जाऊ लागलो आणि मग मला या सर्वांबद्दल आवडही निर्माण झाली. क्रिकेट खेळणे व पतंग उडवण्याची मला आवड होती. टाऊन हॉल, चिटणीस पार्क, रेशीमबाग मैदानात खेळण्यात दिवस निघून जायचा. माझ्या मित्रांचा गोतावळा मोठा होता. त्यांच्यासोबत माझे बालपण अतिशय मजेत गेले. पुढे किशोरवयात संघाशी संबंध आला. शाखेत जायला लागलो. तिथे माझ्यावर राष्ट्रभक्ती आणि सेवा या दोन प्रमुख गोष्टींचे संस्कार झाले. संघटन आणि संवाद या गोष्टीही मी संघाच्या संस्कारातून ग्रहण केल्या. शालेय जीवन संपवून मी कॉमर्सला गेलो. एमकॉम केले. पुढे एलएलबी केले. व्यवसाय व्यवस्थापनाची पदविका घेतली. हे सगळे करीत असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सक्रिय होतो. त्यामुळे नेतृत्व विकसित होत गेले. संघटन कौशल्याचे धडे गिरवता आले. अनेक नामवंतांना ऐकता आले. त्यातून अधिक चांगले बोलायला शिकलो. विद्यार्थी असताना आणीबाणीचा सामना केला. या काळात माझ्या व्यक्तिमत्त्वात मूलतः असलेल्या आक्रमकतेत भर पडली. आई आणि संघामुळे या आक्रमकतेला विचार आणि संस्काराची जोड मिळाली. सावळापूरकर नावाच्या शिक्षकामुळे मला बालपणीच पसायदान मुखोद्गत झाले होते. पारधी, अनंतराव परांजपे, गिजरे या सरांनी ओल्या मातीला आकार दिला.

बातम्या आणखी आहेत...