आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूर:मंत्रोपचाराने कोरोना बरा करण्याचा दावा; नागपुरात भोंदूबाबाला अटक

नागपूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अंनिसने तक्रार केल्यानंर पोलिसांची कारवाई, सट्ट्याचे नंबरही सांगायचा बाबा

कोरोनावरील उपचारांसाठी अजून कोणतेही औषध सापडलेले नसताना नागपुरात मंत्रोपचाराने कोरोना काही क्षणांत बरा करण्याचा दावा करणाऱ्या भोंदूबाबाला पोलिसांनी गजाआड केले आहे. शुभम तायडे (३२) असे या बाबाचे नाव आहे.

एमआयडीसी पोलिस स्टेशनअंतर्गत पंचशीलनगर येथे शुभम तायडे ऊर्फ गुणवंत बाबाचा दर गुरुवारी दरबार भरतो. दैवी शक्तीने आपण पैशाचा पाऊस पाडू शकतो, कोरोनाच काय, कोणताही आजार बरा करू शकतो, गुप्तधन शोधून देतो, असे दावे करणाऱ्या या बाबाचे प्रस्थ परिसरात वाढले होते. त्यामुळे अनेक लोक बाबाच्या दरबारात हजेरी लावत. काही जण बाबाला सट्ट्याचे नंबर विचारायला येत आणि बाबादेखील तो सांगायचा, अशी माहिती समोर आली आहे. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीला याबाबत कळताच त्यांनी आधी एमआयडीसी पोलिस ठाणे गाठून तक्रार केली. बाबाचा दरबार दर गुरुवारी सायंकाळी ६ नंतर भरतो. त्यामुळे अंनिसच्या कार्यकर्त्यांसह पोलिसांनी रात्री ९ वाजता बाबाचा दरबार गाठला. त्याआधीच एक बनावट भक्त आपली समस्या घेऊन बाबाकडे पाठवला होता.

कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बाबा काही क्षणांत निगेटिव्ह करतो, असे तेथील भक्त सांगत होते. काही वेळातच बाबाच्या अंगात शेषनाग संचारला. त्यानंतर त्याने लोटांगण घेतले. त्याच वेळी पोलिस तेथे पोहाेचले. त्यांनी त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अघोरी प्रथा २०१३ अ नुसार गुन्हा दाखल करून अटक केली. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच नागपुरात कोरोनावर उपचाराचा दावा करणाऱ्या एका बोगस डॉक्टरलाही अटक करण्यात आली होती.

लाॅकडाऊन असतानाही ५० जण हजर
सध्या लॉकडाऊन असतानाही बाबाच्या या दरबारात किमान ५० जण हजर होते. त्यामुळे तोही गुन्हा दाखल झाला. तायडेला अटक करून पोलिस स्टेशनला आणले त्या वेळी त्याच्या भक्तांनी पोलिस स्टेशनकडे धाव घेतली व बाबाला सोडा, अशी मागणी ते करू लागले. आपल्याला अटक होणार हे बाबाला अंतर्ज्ञानाने कळले नाही, तर तुमच्या समस्या त्याला काय कळणार, असे पोलिसांनी त्याच्या भक्तांना समजावून सांगून परत पाठवले.

बातम्या आणखी आहेत...