आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भंडारा जिल्हा रुग्णालयाला लागलेल्या आगीत आपली नवजात मुले गमावलेल्या मातांच्या सांत्वनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रविवारी भोजापूर गावातील सोनझारी वस्तीत आले. अशा दुःखाच्या प्रसंगी सरकार आपल्या पाठीशी असल्याचा दिलासा दोन्ही मातांना मुख्यमंत्र्यांनी भेटून दिला.
या घटनेनंतर मुख्यमंत्री रविवारी भंडारा येथे दाखल झाले. भोजापूर गावातील सोनझारी वस्तीत येऊन त्यांनी दोन्ही मातांची भेट घेतली. त्यांची वेदना ऐकून काही क्षण ते निःशब्द झाले. त्यांनी अत्यंत आस्थेवाईकपणे चौकशी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी या कुटुंबांची सर्वतोपरी काळजी घ्यावी, असे आदेश त्यांनी या वेळी दिले. या दुर्घटनेमुळे बालकांच्या कुटुंबांची झालेली हानी कधीही भरून निघणार नाही, याची मला जाणीव आहे. स्वतःचं मूल अशा पद्धतीने जाणं हे अत्यंत हृदयद्रावक आहे, अशा शब्दांत सहवेदना व्यक्त केली.
कोणाला उगाच आरोपी करणार नाही, पण दोषींवर कारवाई करू; मुख्यमंत्र्याची ग्वाही
कोणाला तरी उगाचच आरोपी करणार नाही. पण, दोषी असणाऱ्यांवर कारवाई करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भंडारा येथे दिली. सामान्य रुग्णालयाला भेट दिल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. गेलेले जीव परत येणे शक्य नाही. पण, जे घडले ते नेमके कशामुळे घडले याची कारणे जाणून घेण्यासाठी नागपूरचे विभागीय आयुक्त संजीवकुमार यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली आहे. चौकशी समितीला त्यांचे काम करू द्या. या समितीचा अहवाल आला की, लगेच कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
पीडित कुटुंबीयांचे केले सांत्वन
भोजापूर येथील विश्वनाथ रामचंद्र बेहेरे व गीता बेहेरे कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. या वेळी बेहेरे यांच्या घरी शितेकसा येथील कविता बारेलाल कुमरे याही भेटायला आल्या होत्या. मुख्यमंत्र्यांनी आस्थेने चौकशी करीत दोषींवर कारवाई होईल, असे आश्वासन दिले.
भंडाऱ्यात डॉक्टर व आरोगय कर्मचाऱ्यांशी चर्चा करताना मुख्यमंत्री
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.