आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयोगाचा निर्णय:परस्पर संमतीने होणाऱ्या शरीरसंबंधातील क्रियांचा ‘अनैसर्गिक’ उल्लेख वगळणार, वैद्यकीय अभ्यासक्रमातूनच उल्लेख काढण्याचा आयोगाचा निर्णय

नागपूर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुरूष आणि स्त्री यांच्यातील शरीरसंबंधांमध्ये होणारा सोडोमी तसेच ओरल सेक्स आतापर्यंत वैद्यकीय अभ्यासक्रमात ‘अनैसर्गिक’ मानण्यात येत होता. मात्र, आता वैद्यकीय आयोगाने हा उल्लेखच पुस्तकातून काढून टाकला आहे. परस्परसंमतीने एखादे जोडपे अशा पद्धतीने समागम करीत असेल तर त्याला अनैसर्गिक म्हटले जाणार नाही, अशी माहिती सेवाग्राम वैद्यकीय महाविद्यालयातील न्यायवैद्यक शास्त्र विभागातील प्राध्यापक व न्यायवैद्यकतज्ज्ञ तसेच आयोगाच्या समितीचे सदस्य डॉ. इंद्रजित खांडेकर यांनी दिली.

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या “फॉरेन्सिक मेडिसिन’ या विषयात असलेल्या सोडोमी (गुदद्वारासंबंधीचा संभोग), ओरल सेक्स (मुखमैथुन) यासारख्या लैंगिक क्रियांच्या वर्गीकरणातून “अनैसर्गिक’ हा शब्द काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. याा निर्णयामुळे आता लैंगिक क्रियांना नैसर्गिक व अनैसर्गिक अशा गटात वर्गीकरण करता येणार नाही.

वैद्यकीय अभ्यासक्रमात ‘एलजीबीटी’ या समुदायाविषयीच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आयोगाच्या वैद्यकीय शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा अरुणा वाणीकर यांनी एक तज्ज्ञ समिती स्थापन केली होती. या समितीच्या शिफारशींवर हा निर्णय घेतला आहे. समितीत डॉ. विजेंद्र कुमार बालरोग तज्ज्ञ-दिल्ली, डॉ. प्रभा चंद्रा मानसिक आरोग्य विभाग बंगळुरू, डॉ. सुरेखा किशोर डायरेक्टर एम्स- गोरखपूर आणि डॉ. इंद्रजित खांडेकर सेवाग्राम हे तज्ज्ञ होते.

बळजबरीने होणारे संबंध अनैसर्गिकच
जोडीदाराला अनुकूल असलेली कुठलीही लैंगिक क्रिया हानिकारक किंवा अनैसर्गिक नाही असे वैद्यकीय दृष्टिकोनातून मानले जाते. पण ज्या लैंगिक क्रियेमुळे व्यक्ती वा जोडीदाराला त्रास होत असेल, किंवा ती क्रिया बळजबरीने, इच्छेविरुद्ध किंवा अल्पवयीन मुला- मुलींसोबत केली जात असेल तरच ती मात्र हानिकारक, अनैसर्गिक व आरोग्यास अपायकारक आहे, असे मानले जाते.

बातम्या आणखी आहेत...