आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नागपूर:काँग्रेसला इतर कुणी संपवण्याची गरज नाही, सोनिया आणि राहुल गांधीच संपवतील, भाजपचे खासदार साक्षी महाराजांचे मत

नागपूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ज्योतिरादित्य शिंदे यांची हेडगेवार स्मृतिस्थळाला भेट

काँग्रेसला इतर कुणी संपवण्याची गरज नाही, सोनिया आणि राहुल गांधीच काँग्रेसला संपवतील, असे मत उत्तर प्रदेशातील भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी येथे माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. साक्षी महाराज यांनी आज महाल येथील संघ मुख्यालयात येऊन सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली.

त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. एकेकाळी तराजू आणि तलवार यांना जोडे मारण्याची भाषा करणारे आज ब्राह्मणांचे राजकारण करीत असल्याची टीकाही साक्षी महाराज यांनी केली. सरसंघचालक मोहन भागवत एका बैठकीसाठी नागपुरात आलेत. मंगळवारी संघ मुख्यालयात ही बैठक होती. या बैठकीसाठी साक्षी महाराज यांनी उपस्थिती लावली. या भेटीमुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

ज्योतिरादित्य शिंदे यांची हेडगेवार स्मृतिस्थळाला भेट

नागपूर | काँग्रेसमधून नुकतेच भाजपमध्ये गेलेले खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांनी मंगळवार, २५ ऑगस्ट रोजी नागपूर येथे रेशीमबागेतील डाॅ. हेडगेवार स्मृतिस्थळाला तसेच महालातील डाॅ. हेडगेवार यांच्या निवासस्थानी भेट दिली. या वेळी प्रांत प्रचारक प्रसाद महानकर त्यांच्यासोबत होते.

या वेळी बोलताना शिंदे यांनी हे प्रेरणास्थळ आहे. येथे येऊन राष्ट्राप्रति एका दृढ संकल्पाने पुढे जाण्याची ऊर्जा मिळते, असे सांगितले. काँग्रेसमधील कलह हा काँग्रेसचा अंतर्गत मुद्दा आहे. मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे एखाद्या पक्षाच्या अंतर्गत मुद्द्यावर बोलणे योग्य होणार नाही, असे म्हणत त्यांनी या प्रश्नावर अधिक बोलणे टाळले.

नागपूरला भेट देणारे ज्योतिरादित्य हे तिसरे शिंदे आहेत. यापूर्वी त्यांच्या आजी राजमाता विजयाराजे शिंदे व आत्या वसुंधराराजे शिंदे यांनी रेशीमबाग स्मृतिस्थळाला भेट दिली आहे. सरसंघचालक मोहन भागवत मंगळवारी नागपुरातच होते. त्यांची भेट न घेताच शिंदे यांनी नागपूर सोडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.