आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भरपावसात सभा घेतली होती. त्याचाच कित्ता गिरवीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही भरपावसात भिजत इंधन दरवाढ आणि महागाईच्या विरोधात सायकल मोर्चा काढला. यावेळी ‘माेदी तेरे राज मे, सायकल आगीय हाथ मे’, ‘मोदी सरकार मुर्दाबाद’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
नाना पटोले यांच्या नेतृत्वात शहर आणि जिल्हा काँग्रेसतर्फे या सायकल मोर्चाचे नेतृत्व करण्यात आले होते. आणि नेमकी गुरूवारी सकाळपासून पावसाला सुरूवात झाली. स्थानिक संविधान चौकातून सकाळी ११ वाजता निघणारा मोर्चा पावसामुळे उशिरा निघेल वा पाऊस थांबल्यावर निघेल, असे सर्वांना वाटत होते. पण, नाना पटोले यांनी भर पावसात मोर्चा काढला. क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार, शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे, विधान परिषद सदस्य अभिजित वंजारी, आमदार राजू पारवे, व जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, प्रवक्ते अतुल लाेंढे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संविधान चौक ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यत मोर्चा निघाला. मोर्चात कार्यकर्ते छत्र्या घेऊन सहभागी झाले होते. विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात आले.
यावेळी माध्यमांशी बोलताना पटोले यांनी मोदी सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले. येत्या १७ तारखेपर्यत विविध विषयांना घेऊन आंदोलन करणार असल्याचे सांगितले. आज पेट्रोल व डिझेलचे भाव कमी करणे शक्य असताना मोदी सरकार भाव वाढवून देशातील लोकांना कंगाल करीत असल्याचे पटोले म्हणाले. महागाईने सामान्य माणसाचे कंबरडे मोडल्याचा आरोप पटोले यांनी केला. ऊन, वादळ, वारा वा पाऊसाची तमा न बाळगता सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेसची लढाई असल्याचे ते म्हणाले. आमच्या आंदोलनाची दखल घेत मोदी सरकारला झुकावे लागेल व दरवाढ मागे घ्यावी लागेल असे ते म्हणाले.
औरंगाबादेत सायकलसह बैलगाडीवर मोर्चा
काँग्रेसचा शहागंज ते विभागीय आयुक्त कार्यालयावर पेट्रोल दरवाढीच्या विरोधात रॅली काढण्यात आली.यामध्ये शहराध्यक्ष उंटावर तर काही पदाधिकारी घोड्यावर तर काही सायकल आणि बैलगाडीमध्ये बसून या मोर्चात सहभागी झाले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.