आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्याचे मुख्यमंत्री तथा वनमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत दृरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीसाठी क्लार्कने सवयीने काॅपी-पेस्ट करून नोट तयार केल्यामुळे वाघांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी त्यांची नसबंदी करण्याच्या प्रस्तावाची नव्याने चर्चा सुरू झाली आहे. भांबावलेल्या प्रशासनाने घाईगडबडीत अशी नोट तयार केल्यामुळे त्यात नसबंदीचा मुद्दा परत आल्याची चर्चा वन वर्तुळात आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची वाढती संख्या लक्षात घेता त्यांची नसबंदी करण्याचा प्रस्ताव ७ ऑगस्ट २०२० रोजी झालेल्या राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाच्या बैठकीत चर्चेसाठी ठेवण्यात आला होता. मात्र, त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला. त्यापेक्षा व्यवस्थापन कसे बळकट करता येईल, त्यादृष्टीने प्रयत्न करा अशी सूचना यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली होती. वाघ वाढले म्हणून त्यांना इतरत्र स्थानांतरित करायचे, नसबंदी करायची हा वाढत्या व्याघ्र संख्येमुळे होत असलेल्या मानव-वन्यजीव संघर्षावरील तोडगा नाही. या पर्यायाचा विचार देखील होऊ शकत नाही. त्यापेक्षा व्यवस्थापन कसे बळकट करता येईल, त्यादृष्टीने प्रयत्न करा,’ असे उद्धव ठाकरेंनी सांगितले होते. असे असताना नव्याने वाघांच्या नसबंदीचा विषय चर्चेला कसा आला, याविषयी शोध घेतला असता यामागे काॅपी-पेस्टचा प्रकार असल्याचे समजते. कोणत्याही खात्यात विविध विषयांचा आढावा नियमित घेण्यात येतो. सर्वच विभागांतील क्लार्कनाही या बैठकी सवयीच्या झालेल्या आहेत. आढावा बैठक असली की तारीख बदलून मागील नोटचे अथवा फाइलचे प्रिंट आऊट निघते. मंत्री, राज्यमंत्री वा विभागाचे सचिव पदे भरण्याचे निर्देश देतात. नि नंतर पुन्हा “ये रे माझ्या मागल्या’ सुरू होते, असे चित्र आहे.
यामुळे आला विषय नव्याने चर्चेत
मुख्यमंत्र्यांसोबत दृरदृष्य प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीसाठी काॅपी- पेस्ट नोट तयार करण्यात आल्याने नव्याने नसबंदीचा मुद्दा चर्चेला आल्याचे सूत्रांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. कारण मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत प्रत्यक्ष वाघांच्या नसबंदीचा विषय चर्चेला आलाच नाही. मात्र, नोटमधील हा मुद्दा व्हायरल झाला. परिणामी आपल्याकडेही याबाबत विचारणा वाढली. आपण प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव यांना याची स्पष्ट कल्पना दिल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.