आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nagpur
  • Corona Found 25 New Patients In 24 Hours; Municipal Administration Alert, Nagpur Airport, Railway Station, Market, Malls, Vegetable Market Will Also Be Tested

दक्षता:नागपुरात कोरोनाचे 24 तासांमध्ये 25 नवे रुग्ण आढळले; महापालिका प्रशासन अलर्ट, विमानतळ, रेल्वे स्टेशन, इ. ठिकाणी होणार चाचणी

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नागपुरात कोरोना नियंत्रणात असतानाच मंगळवारी २४ तासांत जिल्ह्यात तब्बल २५ नवीन रुग्णांची भर पडल्याने प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. नवीन रुग्णांमध्ये नागपूर शहरातील १५, ग्रामीणमधील ७, जिल्ह्याबाहेरील ३ अशा एकूण २५ रुग्णांचा समावेश आहे. नागपूर शहरात कोरोना रुग्णांची संख्या हळुहळू वाढत आहे. कोरोना संसर्गाची साखळी खंडीत करण्यासाठी जास्तीत जास्त कोरोना चाचणीवर भर देण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी दिले आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता मंगळवारी मनपा मुख्यालयातील कोरोना वॉर रूममध्ये आरोग्य विभागाची एक महत्वाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत आयुक्तांनी उपरोक्त निर्देश दिले. दिल्ली आणि मुंबई येथून विमानाने येणाऱ्या प्रवाशांनी तसेच त्यांच्या संपर्कात येणाऱ्या नागरिकांनी चाचणी करण्याचेही निर्देश मनपा आयुक्तांनी दिले. मनपा आयुक्तांच्या निर्देशानुसार आरोग्य विभागाद्वारे बाजारपेठ, मॉल्स, भाजी बाजार अशा सर्व गर्दीच्या ठिकाणी सुपर स्पेडर्स ठरणाऱ्या व्यक्तींच्या चाचणीवरही भर देण्यात येणार आहे. रेल्वे स्थानकांवर सुद्धा प्रवाशांची चाचणी केली जाणार आहे. कोरोनाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेण्याचे आवाहन मनपा आयुक्तांनी केले आहे. तसेच त्यांनी गर्दीच्या ठिकाणी किंवा समारंभात मास्कचा वापर करणे, शारीरिक अंतर ठेवण्याचे आवाहन केले.

प्रारंभी आयुक्तांनी सर्व झोनमध्ये कोरोनाच्या संभाव्य धोक्यापासून बचावाच्या दृष्टीने करण्यात येत असलेल्या तयारीची माहिती घेतली. कोरोना संसर्गाची साखळी खंडित करण्यासाठी सर्वप्रथम कोरोना संशयित तसेच लक्षणे आढळणाऱ्या व्यक्तींची चाचणी करणे आवश्यक असून त्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात यावी आणि बाजारपेठेत रॅपिड अँटिजेन चाचणी केली जावी. रुग्णालयात तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांची कोरोना चाचणी करावी. कोरोनाबाधित रुग्णांच्या प्रवासाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन त्यांची सर्व ट्रॅव्हल हिस्ट्री काढावी. त्यांच्या संपर्कातील सर्व निकटवर्तीयांची चाचणी करण्याचेही आयुक्तांनी निर्देशित केले.

कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता मनपा आरोग्य विभाग आणि प्रशासन पूर्णत: सज्ज झाले आहे. नागपूर शहरातील विविध भागांमध्ये सध्या ३६ केंद्रांवर कोरोना चाचणी केली जात आहे. कुणालाही सर्दी, खोकल्याचा त्रास असल्यास त्यांनी मनपाच्या कोरोना चाचणी केंद्रावरून नि:शुल्क चाचणी करण्याचे आवाहनही आयुक्तांनी केले. सध्या नागपुरात ९९ टक्के पेक्षा जास्त नागरिकांनी कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाचा पहिला डोस आणि ७९ टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे.

शहरात १८ वर्षावरील वयोगटात १०४ टक्के नागरिकांनी पहिला डोस घेतला असून ८४ टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच १५ ते १७ वर्ष वयोगटातील ६६ टक्के पात्र व्यक्तींनी पहिला डोस घेतला असून, ५० टक्के यांनी दुसरा डोस घेतला आहे. १२ ते १४ वर्ष वयोगटामध्ये ३९ टक्के मुलांनी पहिला आणि १७ टक्के मुलांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच १८ ते ५९ वयोगटातील ६०२८ नागरिकांनी बुस्टर डोस घेतला आहे.

पात्र नागरिकांनी लसीकरणाचे दोन्ही डोस घेण्याचे आवाहन

नागपूर शहराची लोकसंख्या २६८५८३५ एवढी असून लसीकरणासाठी पात्र लाभार्थींची संख्या २१,८९,०२५ एवढी आहे. यापैकी पहिला डोस २१,७२,०१४ नागरिकांनी आणि १७,३४,६२५ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे पात्र नागरिकांनी लसीकरणाचे दोन्ही डोस घेऊन स्वतःला सुरक्षित करावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता मंगळवारी मनपा मुख्यालयातील कोरोना वॉर रूममध्ये आरोग्य विभागाची बैठक घेऊन आयुक्तांनी सतर्कतेच्या सूचना दिल्या.

बातम्या आणखी आहेत...