आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:वाघाच्या बछड्याची काेरोना टेस्ट, भोपाळहून येणार अहवाल

नागपूरएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • जोखीम नको म्हणून तांत्रिक कारणास्तव नागपूर प्रयोगशाळेने साभार परत केला नमुना

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील सुशी (दाबगाव) येथे शुक्रवार २४ एप्रिल रोजी सकाळी ३ ते ४ महिन्यांचा वाघाचा मादी बछडा सापडला होता. या बछड्याला चंद्रपूर येथील ट्रान्झिट ट्रीटमेेंट सेंटरमध्ये पाठवले आहे. सध्या कोरोनाची साथ सुरू असल्याने या बछड्याचा स्वॅब नागपूर येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आला होता. मात्र, पशुवैद्यकीय महाविद्यालयाने तांत्रिक कारणास्तव हा नमुना साभार परत केला. या संदर्भात पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता ए. टी. सोमकुंवर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याला दुजोरा दिला.

असे आहे तांत्रिक कारण

प्राण्यांच्या घशातील स्रावांचे नमुने तपासण्याची मान्यता मध्य प्रदेेश, हरियाणा व उत्तर प्रदेश येथील प्रयोगशाळांना आहे. मध्य प्रदेशातील भोपाळ, उत्तर प्रदेशातील बरेली व हरियाणातील हिस्सार येथे या प्रयोगशाळा आहेत. वाघाच्या बछड्याच्या घशातील स्रावाचा नमुना नाइट शिफ्टला तपासण्याचे ठरले होते. तत्पूर्वी सहकाऱ्यांशी झालेल्या चर्चेत नागपूर प्रयाेगशाळेला प्राण्यांचे नमुने तपासण्याची मान्यता नसल्याने ते परत करून तपासण्यासाठी भोपाळ प्रयोगशाळेत पाठवण्यास सांगण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार संबंधितांना परत करण्यात आल्याचे ए. टी. सोमकुंवर यांनी सांगितले.

नागपूर मान्यतेसाठी प्रयत्न

प्राण्यांच्या घशातील ठशांचे नमुने तपासण्याची मान्यता नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेला नाही. संपूर्ण देशभर नागपूरची ओळख वाघपूर अशी आहे. नवेगाव बांध, ताडोबा, नागझिरा अशी अनेक अभयारण्ये नागपूर विभागात आहेत. सध्या प्राण्यांचे नमुने तपासणीसाठी भोपाळला पाठविण्यात येतात. भविष्यात प्राण्यांसाठीच्या तपासणीची गरज लक्षात घेता नागपूर येथील प्रयोगशाळेला आयसीएमआरची मान्यता घेण्यात येण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सोमकुंवर यांनी या वेळी सांगितले.

वन विभागाकडून चार टीमद्वारे आईचा शोध सुरू

बछड्याच्या आईचा शोध घेण्यासाठी वन विभागाने एनजीओचे प्रतिनिधी, गावकऱ्यांचा समावेश असलेल्या चार टीम तयार केल्या आहेत. जंगल परिसरात २९ कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले आहेत. विभागीय वनाधिकारी ए. एल. सोनकुसरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनसंरक्षक एस. एल. लखमावाड, वनपरिक्षेत्राधिकारी व्ही. एन. राजूरकर वाघिणीचा शोध घेत आहेत.

गुंतागुंत न वाढण्यासाठी प्रयत्न

नागपूर येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेला कोरोनासाठी माणसांच्या घशातील स्रावांचे नमुने तपासण्याची मान्यता आहे. प्राण्यांच्या घशातील स्रावांचे नमुने तपासण्याची मान्यता मध्य प्रदेेश, हरियाणा व उत्तर प्रदेश येथील प्रयोगशाळांना आहे. त्यामुळे गुंतागुंत वाढू नये म्हणून बछड्याच्या घशातील स्रावाचे नमुने ते भोपाळ प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यास सांगितले आहे. - ए. टी. सोमकुंवर, सहयोगी अधिष्ठाता.

लवकरच नमुना पाठवू

वाघाच्या बछड्याच्या घशातील स्रावाचा नमुना तपासणीसाठी भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठविण्यास सांगण्यात आले आहे. लवकरच हा नमुना भोपाळला पाठवण्यात येईल. यासाठी पशुवैद्यकीय महाविद्यालयाचेही सहकार्य मिळणार आहे. - ए. एल. सोनकुसरे, विभागीय वनाधिकारी, चंद्रपूर.

बातम्या आणखी आहेत...