आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोना काळात पॅरोलवर बाहेर पडलेल्या 4 हजार 253 कैद्यांपैकी 350 फरार कैद्यांना शरण येण्याचे सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत. फरार झालेल्या कैद्यांवर तुरुंग प्रशासनाकडून राज्यभर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रीया सुरू करण्यात आली असून आतापर्यंत विविध पोलिस ठाण्यात 291 पेक्षा अधिक गुन्हे दाखल केल्याची माहिती आहे.
फरार कैद्यांपैकी अनेकांवर गंभीर गुन्हे दाखल असून जन्मठेप झालेल्या कैद्यांचा देखील यामध्ये समावेश आहे. जानेवारी 2023 अखेर फरार कैद्यांपैकी 8 जण स्वत:हून तुरूंगात दाखल झाले. तर 19 जणांना पोलिसांनी पकडून परत आणल्याची माहिती अहवालात दिली आहे.
नक्की प्रकरण काय?
राज्यातील तुरूंगात क्षमतेपेक्षा जास्त कैदी आहे. कोरोना काळात कैद्यांनाही कोरोना होण्याचा धोका लक्षात घेता सर्वोच्च न्यायालयाने कच्च्या कैद्यांना पॅरोलवर सोडण्याचे आदेेश दिले होते. त्यानुसार राज्यातही गुन्हेगारांना पॅरोलवर सोडण्यात आले होते. कोरोना संपल्यावर त्यांना तुरुंगात रिपोर्ट करायचा होता. परंतु, अनेक जण आले नाही. तुरूंग प्रशासनाने संपूर्ण यादी घेत सर्व संबंधित पोलिस ठाण्यांना पकडण्यास सांगितले. आतापर्यंत 19 जणांना अटक करून त्यांना पुन्हा कारागृहात पाठवले आहे.
350 कैदी फरार
राज्यात लहानमोठे असे एकूण 60 कारागृह असून या सर्व कारागृहात सध्याच्या घडीला न्यायबंदी आणि शिक्षा झालेले मिळून 43 हजार 46 कैदी आहेत. कोरोनाच्या काळात कारागृहातील कैद्यांची संख्या कमी करण्यासाठी न्यायबंदी असलेल्या कैद्यांना तात्पुरता जामीन तसेच शिक्षा झालेल्या कैद्यांना तत्कालीन संचित रजा मंजूर करण्यात यावी असे आदेश राज्य शासनाकडून देण्यात आले होते. कारागृह प्रशासनाने कोरोनाच्या काळात 4 हजार 253 शिक्षा झालेल्या कैद्यांना संचित रजेवर पाठवले होते.
खटले नोंदवण्याचे निर्देश
महाराष्ट्र सरकारने आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 अंतर्गत लादलेले सर्व निर्बंध मागे घेतल्यानंतर, राज्याच्या गृह विभागाने 4 मे 2022 रोजी सर्व दोषी कैद्यांना कारागृहात परत येण्याचे निर्देश देऊन तात्पुरत्या पॅरोलबाबत आदेश जारी केला. परत न आलेल्या कैद्यांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 224 (कायदेशीर कोठडीला विरोध करणे) अंतर्गत खटले नोंदवण्याचे निर्देशही गृह विभागाने कारागृह विभागाला दिले आहेत.
प्रक्रिया सुरु
या आदेशानंतर कारागृह विभागाने तातडीच्या पॅरोलचा लाभ घेतलेल्या सर्व कैद्यांच्या पॅरोल स्थितीचा आढावा घेण्यास सुरुवात केली असता 3,903 कैदी कारागृहात परतले. उर्वरित 350 अजून फरार आहे. कारागृह प्रशासनाने राज्यातील विविध पोलीस ठाण्यात 291पेक्षा अधिक गुन्हे दाखल केले असून 52 जणांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती कारागृह प्रशासनातील एका अधिकाऱ्याने दिली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.