आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना लस:कोणतीही लस 100% परिणामकारक नसतेच, त्याचे साइड इफेक्ट होतीलच; ICMRचे माजी वैज्ञानिक रमण गंगाखेडकर यांचे स्पष्ट मत

अतुल पेठकर | नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनाच्या नियमांचे पालन केले असते तर लसीची गरजच पडली नसती - गंगाखेडकर

सध्या जगात व्हॅक्सिन वाॅर सुरू आहे. ब्रिटनने फायझर लसीला मान्यता दिली आहे. रशियाची ‘स्पुटनिक व्ही’, अमेरिकेत माॅडर्ना व फायझरची लस तर भारतात सीरमची कोव्हिशील्ड लस येणार आहे. ६५ ते ९० टक्के परिणामकारकतेचा दावा या लस निर्मात्या कंपन्यांनी केला आहे. मास्क आणि फिजिकल डिस्टन्सचे पालन करतोय ना, मग लसीची गरज काय, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. या सर्व प्रश्नांवर भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या साथरोग व संसर्गजन्य रोग विभागाचे निवृत्त वैज्ञानिक पद्मश्री डाॅ. रमण गंगाखेडकर यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी कोणतीही लस शंभर टक्के परिणामकारक कधीच नसते, असा दावा केला आहे.

कुठलीही लस घेतली की त्याने काहीही त्रास होणार नाही, अशा प्रकारचे औषध अॅलोपॅथीमध्ये तयार झालेले नाही. त्यामुळे लस घेतली तर त्याचा कुठलाच साइड इफेक्ट होणार नाही, असा विचार करणे चुकीचे आहे. इंजेक्शन दिल्यावर सुजणे, थकल्यासारखे जाणवणे, ताप येणे किंवा इतर काहीतरी दुष्परिणाम होतातच. आतापर्यंत दुष्परिणाम न होणारी लस निघालेली नाही असे गंगाखेडकर म्हणाले.

आयर्न वा व्हिटॅमिनचेही दुष्परिणाम असतातच. त्यामुळे दुष्परिणामांकडे पाहून कोणी लस न घेण्याचा निर्णय घेत असेल तर त्याला आपला फायदा कशात आहे, हे कळलेले नाही, असे म्हणावे लागेल. अपघाताची भीती असते म्हणून कोणी प्रवास करणे थांबवत नाही. वाहतूक नियमांचे पालन केले तर अपघाताची शक्यता कमी राहाते, याकडे गंगाखेडकर यांनी लक्ष वेधले.

नियमांचे पालन केले असते तर लसीची गरजच पडली नसती :

मास्क घातला आणि फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन केले की कोरोना होत नाही, हे काेणी सांगितले? नियमांचे काटेकोर पालन केल्याने शंभर टक्के प्रतिबंध झाला असता तर लस शोधण्याची गरजच नव्हती. लस घेण्याची कोणी कोणाला जबरदस्ती करू शकणार नाही, हेही स्पष्ट आहे, असे गंगाखेडकर म्हणाले. प्रत्येक गोष्टीकडे आपण नकारात्मक पाहणे योग्य नाही. लसीविषयी इतके संशयी होण्यासारखे काही कारण नाही. बाजारपेठीय यशाच्या अधीरतेमुळे सर्व धोक्यांकडे दुर्लक्ष करून लस बाजारात आणण्याचा आरोप होणे आणि स्वयंसेवकांवर चाचणीचे दुष्परिणाम दिसून येणे या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. दुष्परिणाम व्हॅक्सिनशी संबंधित आहे की नाही, हे अजून स्पष्ट व्हायचेय.

विज्ञानाचा नियम लसीला लावता येणार नाही

विज्ञानाचा प्रयोग एक तर यशस्वी होतो वा अयशस्वी होतो. तसा विज्ञानाचा नियम लसीला लावता येणार नाही. फायझर या लस निर्मिती कंपनीचे माजी उपाध्यक्ष मायकेल इटल यांनी एकतर कोणतीही लस १०० टक्के परिणामकारक असते वा नसते, असे वक्तव्य केले होते. ते तसे बोलले असतील तर ते खरे नाही. काेणतीही लस १०० टक्के परिणामकारक असू शकत नाही वा ती लस घेतल्याने कोणतेही साईड इफेक्ट होणार नाही, असे कदापि होत नाही. तीव्र दुष्परिणाम नसावे यापूर्वी लसीची चाचणी केली जाते, असे गंगाखेडकर म्हणाले.

व्यक्तिपरत्वे रिअॅक्शन वेगळ्या असतात

यासाठी सरकारची सीडीएससीओ म्हणजे ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया ही संस्था आहे. ही संस्था सर्व प्रकारच्या चाचण्यांचे निष्कर्ष तपासून लस वा औषध बाजारात आणण्याची परवानगी देते. प्रत्येक लसीची परिणामकारकता वेगवेगळी असू शकते. १०० टक्के किंवा शून्य टक्के असे लाॅजीक चुकीचे आहे. व्यक्तिपरत्वे रोगप्रतिकारक शक्तीनुसार रिएक्शन वेगवेगळी येऊ शकते. आपण नेहमी आपल्याला सोयीचा विचार करतो. पण, असा प्रकार करणे चुकीचे राहू शकते. लस कोणीही फ्री देणार नाही, असे मत गंगाखेडकर यांनी व्यक्त केले.

अजूनही पहिलीच लाट

दुसऱ्या लाटेचा कोणी बागुलबुवा का निर्माण करील? संपूर्ण युरोप, अमेरिका व जर्मनी हे देश दुसऱ्या किंबहुना तिसऱ्या लाटेच्याही पुढे गेलाय. त्याची कारणे लोकांचा बिनधास्तपणा आणि बेफिकीरी ही आहे. मला काही होणार नाही, माझी प्रतिकारशक्ती उत्तम आहे, त्यामुळे कोरोनाविषयक नियमांचे पालन करण्याकडे होणारे दुर्लक्ष झाले. त्याचे दुष्परिणाम त्या देशांनी भोगले. आपल्या देशात त्या मानाने नियमांचे चांगले पालन होत आहे. परिणामी आपण अजूनही पहिल्या लाटेत आहोत. लाॅकडाऊनचाही यात वाटा आहे. पण, लोकांनी पालन करणे टाळायला सुरूवात केली तर दुसरी लाटच काय काहीही येऊ शकते. जे टाळू शकतो ते टाळण्याऐवजी असे काही होणारच नाही, असा विचार करणे यात आपण आपले नुकसान करणे आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser