आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूर:लाेक असेच बेफिकिर राहिले तर कोरोनाच्या लाटा येतील, आरोग्य विश्लेषक डाॅ. अविनाश भोंडवे यांचे मत

नागपूर / अतुल पेठकरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

“लाॅकडाऊन-१’ मध्ये २५ मार्च ते ३१ मे २०२० या कालावधीत सारे व्यवहार बंद होते. त्याचे आर्थिक, सामाजिक, औद्योगिक परिणाम आपण पाहिले. शिवाय त्यानंतरही रुग्णसंख्या वाढलीच. त्यामुळे लाॅकडाऊन पुन्हा लावणे योग्य होणार नाही. लाॅकडाऊन हा कोरोनाला रोखण्यासाठी कायम उपाय होऊ शकत नाही, असे सांगतानाच लोक असेच बेफिकीर आणि बिनधास्त वागत राहिले तर कोरोनाची तिसरीच नव्हे, तर लाटांवर लाटा येतील, असे रोखठोक मत महाराष्ट्र आयएमएचे माजी अध्यक्ष व सुप्रसिद्ध आरोग्य विश्लेषक डाॅ. अविनाश भोंडवे यांनी मांडले.

सध्या राज्य सरकारने लाॅकडाऊन लावण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला दिलेले आहेत. त्यानुसार लाॅकडाऊन लावण्यात येत आहे. मात्र, तरीही रुग्णवाढीचा दर दुपटीहून जास्त आहे. लाॅकडाऊन रुग्णवाढीच्या डबलिंग रेटशी समांतर असावे लागते. तसे केले तर दीर्घकालीन लाॅकडाऊन करावे लागेल. सध्या ते योग्य होणार नाही, असे डाॅ. भोंडवे यांनी सांगितले.

जगातील २२० देशांत कोरोना पसरला आहे. त्यामुळे कोरोना ही व्यापारी साखळी असल्याचा व भीतीचा आरोप चुकीचा आहे. पूर्वी दीडशे ते दोनशे रुपयाला मास्क यायचा. आता २५ रुपयांत दोन येतात. खासगी रुग्णालयात फक्त २५० रुपयांत लस मिळते. रेमडेसिविरची किंमत १५०० पर्यंत मर्यादित करणार आहे. मग यात व्यापार कुठे आला, असा सवाल डाॅ. भोंडवे यांनी केला. बेसावध आणि बेफिकीरपणाचे परिणाम पाहायचे असतील तर सर्वात माेठे उदाहरण ब्राझीलचे आहे. तेथील राष्ट्राध्यक्षांनी कोराेनाला कमी लेखले. आज तिथे परिवर्तित विषाणूमुळे संसर्ग वाढलेला आहे. त्यांनी आता भारताकडे लसीची मागणी केली आहे. कोरोना एक साधा सर्दीचा आजार आहे, कोरोनाची अकारण भीती निर्माण केली जात आहे, यात मोठी व्यापार साखळी आहे, असे अनेक जण सांगतात. खरे तर यामुळे लोक जास्त बेफिकीर आणि बिनधास्त होत असल्याचे ते म्हणाले.

लाेकांकडून सर्रास नियम पायदळी
लोक सर्रास नियम पायदळी तुडवत फिरत आहेत. यामुळे तिसरी लाट येऊ शकते. ती जास्त धोकादायक राहू शकते. अशा लाटांमागून लाटा येऊ शकतात. तेव्हा लोकांनी नियमांचे पालन केलेले केव्हाही चांगले. हा घाबरवण्याचा प्रकार नाही. अलीकडे कोरोनाला खूप विरोध होत असल्याचे डॉ. भोंडवे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...