आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

दिव्य मराठी विशेष:दहा हजार नियमित कर्मचारी असताना 176 लाख, अन् 138 कर्मचाऱ्यांच्या बळावर 218.73 लाख क्विंटल कापूस खरेदी

नागपूर : अतुल पेठकर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनामुळे इतर संस्था मोडकळीस आलेल्या असताना पणन महासंघाला अच्छे दिन

वीस वर्षांपूर्वी दहा हजार नियमित कर्मचारी असताना सुमारे १७६ लाख क्विंटल कापूस खरेदी करणाऱ्या पणन महासंघाने यंदा लॉकडाऊनच्या काळात सरव्यवस्थापकांसह केवळ १३८ कर्मचाऱ्यांच्या साह्याने २१८.७३ लाख क्विंटल अशी विक्रमी कापूस खरेदी केली आहे. एकेकाळी कापूस एकाधिकार योजना असताना पणन महासंघाच्या केंद्रांवर शेतकऱ्यांच्या रांगा लागायच्या. वणीसारख्या ठिकाणी गोळीबाराची घटना घडली होती. शेतकरी गाड्या घेऊन मुक्कामी येत होते. त्यानंतर शून्यापासून थेट लाख क्विंटलपर्यंत खरेदी होत होती. या पार्श्वभूमीवर कापूस खरेदीचा प्रारंभापासून आढावा घेतला असता १० हजार नियमित कर्मचारी आणि कंत्राटी, हंगामी वगैरे १५ हजार ते २५ हजार कर्मचाऱ्यांचा राबता असताना मताधिकार योजनेच्या काळात १९९९-२००० मध्ये १७५.९८ लाख क्विंटल खरेदी झाली होती. तर यापूर्वीची सर्वाधिक खरेदी २००४-०५ मध्ये २११.६५ लाख क्विंटल झाली होती. त्यानंतर शेवटची मोठी खरेदी २००८-०९ मध्ये १६७.९४ लाख क्विंटल इतकी झाली होती. त्यानंतर त्यासाठी एकदम २०१९-२० चा हंगाम पाहावा लागला.

उगाच पाठ थोपटून घेऊ नये
कोरोना काळातही विक्रमी कापूस खरेदी केली म्हणून पणन महासंघाने उगाच आपली पाठ थोपटून घेऊ नये. बाजारात भावामध्ये विक्रमी घसरण होती म्हणून खरेदी झाली, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. ४५०० रुपये क्विंटलपेक्षा जास्त भाव देण्यास व्यापारी, शेतकरी सहकारी खरेदी विक्री संस्था तसेच उत्पादक कंपन्याही तयार नव्हत्या. २०१८-१९ च्या हंगामात ५७०० ते ६५०० पर्यत भाव मिळाले. पणन महासंघ इतका चांगला होता तर मागील वर्षी शेतकरी का फिरकले नाहीत? - विजय जावंधिया, शेतकरी नेते

कौतुकामुळे हुरूप आला
कोरोना काळात कोणी काम करायला तयार नसताना ग्रेडरसह सर्व कर्मचाऱ्यांनी जिवाची पर्वा न करता काम केले. मुख्य सचिवांपासून अध्यक्षांपर्यंत सर्वांनी कौतुक केल्याने कामाचा हुरूप आणखी वाढला आहे - जयेश महाजन, सरव्यवस्थापक

स्वेच्छानिवृत्ती योजना
सन २००५ मध्ये पणन महासंघात स्वेच्छानिवृत्ती योजना आली. त्यावेळी ४,८२२ कर्मचाऱ्यांपैकी ३,९९० कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्याने ८३२ कर्मचारी उरले. कालांतराने कमी कमी होत आता फक्त १३८ कर्मचारी असून त्यात ४० चतुर्थ श्रेणी आहेत.