आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संशोधन:आता टेस्ट ट्यूब बेबीद्वारे कालवडींचाही जन्म ; 20 लिटर दूध उत्पादन क्षमता, नागपूर येथील महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठात संशोधन

नागपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
नव्या तंत्रज्ञानाद्वारे जन्माला आलेली पहिली कालवड - Divya Marathi
नव्या तंत्रज्ञानाद्वारे जन्माला आलेली पहिली कालवड

भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाद्वारे (टेस्ट ट्यूब बेबी) नैसर्गिकरीत्या कालवडींना जन्म देणे आता सहज साध्य झाले आहे. नागपूर येथील महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठातील माफसू डॉ. एस. के. सहातपुरे यांनी संशोधन केले आहे. ‘या नव्या तंत्रज्ञानाद्वारे आतापर्यंत ६० गायींच्या गर्भात गर्भारोपण करण्यात आले. आतापर्यंत १५ गायींना टेस्ट ट्यूब बेबी तंत्रज्ञानाद्वारे गर्भधारणा झाली असून त्यापैकी दोन गायींनी कालवडींना जन्म दिल्याची माहिती डाॅ. सहातपुरे यांनी दिली.’ त्यांचे संशोधन शेतकऱ्यांसाठी वरदान ठरले आहे. दरम्यान, गाईच्या पाडसाला वासरू, पाडा किंवा खोंड (नर) किंवा पाडी किंवा कालवड (मादी) म्हणतात.

या नव्या तंत्रज्ञानाद्वारे पहिल्या दोन कालवडींचा जन्म जानेवारी महिन्यात नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयात नैसर्गिकरीत्या झाला असून त्यांची प्रकृती उत्तम आहे. जैवतंत्रज्ञानात उच्च दुग्ध उत्पादन क्षमता असणाऱ्या वर्गीकृत देशी गायीच्या (दाता गाय) गर्भाशयाच्या बिजांडावरील बीजकोशातून स्त्री बीज अल्ट्रासोनोग्राफीच्या मदतीने एका नलिकेत शोषून घेतले जाते व भ्रूण प्रत्यारोपण प्रयोगशाळेत ह्या स्त्री बीजाचे नि:खलन आणि पुरुष बीजाशी फलितीकरण प्रक्रिया करून निर्माण झालेला भ्रूण (टेस्ट ट्यूब बेबी) ८ दिवस प्रयोगशाळेत एका विशिष्ट वातावरणात वाढवून ८ दिवसांचा भ्रूण प्रत्यारोपणाकरिता तयार करण्यात येतो. हा तयार झालेला भ्रूण कमी दुग्ध उत्पादन क्षमता असणाऱ्या अवर्गीकृत गायीच्या गर्भाशयात विना शस्त्रक्रिया प्रत्यारोपित करण्यात येतो. गर्भधारणेचा निश्चित कालावधी पूर्ण झाल्यावर कमी दुग्ध उत्पादन क्षमता असलेली अवर्गीकृत गाय उच्च दुग्ध उत्पादन क्षमता असलेल्या वर्गीकृत जातीच्या गायीच्या वासराला नैसर्गिकरीत्या जन्म देते. असे वासरू वयात येवून नैसर्गिक गर्भधारणे नंतर २०-२५ लिटर दुग्ध उत्पादन देऊ शकते.

१२०० गर्भ प्रत्यारोपण करणार, ३०० कालवडी जन्माला घालण्याचे लक्ष्य
राष्ट्रीय गोकुळ मिशन, भारत सरकार यांच्या आर्थिक सहकार्याने भ्रूण प्रत्यारोपणाचा प्रयोग शासकीय संस्थे मार्फत सध्या विदर्भातच होत आहे. नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर, गडचिरोली येथील महाराष्ट्र शासनाच्या वळू माता संगोपन केंद्र, तसेच नागपूरच्या धंतोली येथील गोरक्षण सभा व कोरडे गोशाळा, कळमना इथे या तंत्रज्ञानाचा वापर करून यशस्वी प्रयोग करण्यात आले. या प्रकल्पासाठी २ कोटी ९७ लाख रूपये देण्यात आले आहेत. या प्रकल्पांतर्गत तीन वर्षांत १२०० गर्भ प्रत्यारोपित करायचे असून अंदाजे ३०० कालवडी जन्माला घालायच्या आहेत.

भृण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाच्या यशस्वी उपयोगाकरिता कुलगुरू प्रा. डॉ. कर्नल ए. एम. पातुरकर, संशोधन संचालक डॉ. एन. व्ही. कुरकुरे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. ए. पी. सोमकुवर यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधक व प्रकल्प प्रमुख डॉ. एस. के. सहातपुरे, सहायक प्राध्यापक डॉ. मनोज पाटील, प्राध्यापक डॉ. डी. एस. रघुवंशी व सहायक प्राध्यापक डॉ. मीनाक्षी बावस्कर यांनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...