आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागोवंश तस्करी व कत्तलींची गंभीर दखल घेत नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी गुन्हेशाखेचे युनिट पाच तडकाफडकी बरखास्त केल्याची कारवाई ताजी असतानाच मंगळवारी त्यांंनी यशोधरानगर पोलिस ठाण्यातील डी. बी. पथकातील आठ कर्मचाऱ्यांसह दोन अधिकाऱ्यांनाही निलंबित केले. यामुळे नागपूर पोलिस दलात खळबळ माजली आहे.
गोवंश तस्करीच्या बाबतीत कुठलीही आगळीक सहन केली जाणार नाही अशी तंबी पोलिस आयुक्तांनी दिली आहे. एपीआय कन्नाके, पीएसआय शिरडोले यांचा यात समावेश आहे.
रविवारी गुन्हेशाखेच्या यूनिट पाचमधील चार अधिकाऱ्यांसह २० कर्मचाऱ्यांची पोलिस मुख्यालयात बदली करण्यात आली. आयुक्तांच्या या कठोर कारवाईमुळे पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असतानाच मंगळवारी निलंबनाची कारवाई झाली. बदली झालेल्या अधिकाऱ्यामध्ये युनिट पाचचे प्रमुख किशोर पर्वते यांचाही समावेश आहे.
गुन्हेशाखेच्या युनिट तीनने आरिफ ऊर्फ बाबा कुरेशी व सोनू मुश्ताक कुरेशी या दोघांना सापळा रचून पकडले. त्यांच्याकडून २४ गोवंशांची सुटका केली. त्यानंतर पथकाने टिपू सुलतान चौक परिसरात नजीम शेख अहमद कुरेशी (वय २६), शेख अहमद इब्राहिम कुरेशी (वय ६३) व मोहम्मद फिरोज करीम अन्सारी (वय ३८, रा. एकतानगर) या तिघांना पकडले. त्यांच्याकडून १० गोवंशांची सुटका करीत ऑटोरिक्षा जप्त केला. या कारवाईनंतर पथकाने अकरम वकील व हैदरच्या कत्तलखान्यावर छापा टाकला.
पोलिसांनी येथून १९ गोवशांची सुटका करीत एक हजार किलो गोमास जप्त केले. अशाप्रकारे युनिट तीनच्या पथकाने तीन ठिकाणी छापे टाकून एकूण ५३ गोवंशांची सुटका केली. या कत्तलखान्यांबाबत युनिट पाचचे पथक यशोधरानगर पोलिसांना माहिती नसल्याने आयुक्त चांगलेच संतापले. त्यांनी अधिकाऱ्यांना फटकारत तडकाफडकी युनिट पाचच्या २० अधिकारी व कर्मचाऱ्यांची मुख्यालयात बदली केली.
उपायुक्तांना चौकशीचे आदेश
परिमंडळ पाचअंतर्गत अवैध कत्तलखाने व गोवंशाची तस्करी होते. याप्रकरणात परिमंडळांतर्गत येणाऱ्या सर्वच पोलिस स्टेशनचे डीबी पथक व बीट मार्शलच्या भूमिकेचा तपास करण्याचे आदेश अमितेशकुमार यांनी पोलिस उपायुक्त श्रवण दत्त यांना दिले. सोमवापासून दत्त यांनी चौकशीला सुरुवात केली. त्या नंतर निलंबित करण्यात आले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.