आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:शेतकरी संघटनेचा सविनय कायदेभंग; राज्यात 10 लाख हेक्टरवर प्रतिबंधित एचटीबीटीची लागवड

नागपूर / अतुल पेठकर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 60 हजार पाकिटे बांधावर पोहोचवण्यात शेतकरी संघटनेची मदत

शेतकरी संघटनेच्या सविनय कायदेभंग आंदोलनात राज्यात ३६% म्हणजे १० लाख हेक्टरवर प्रतिबंधित एचटीबीटी बियाण्यांची लागवड करण्यात आली आहे. ही माहिती शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष व आंदोलनाचे प्रणेते ललित बहाळे यांनी दिली. शेतकरी संघटनेच्या जीएम बियाणे माहिती व तंत्रज्ञान केंद्रावर १२ हजार शेतकऱ्यांनी संपर्क साधत बियाणे घेतल्याचे ते म्हणाले.

राज्यात तणरोधक एचटीबीटी बियाण्याला कायद्याने बंदी आहे. मात्र त्याचा परिणाम शेतकऱ्यांचे आरोग्य व जमिनीवर होतो. पेरणीच्या परिसरात कॅन्सर, किडनी आजार होत असल्याच्या अफवा काही पर्यावरण अतिरेकी संघटना पसरवत आहेत. शेतकरी संघटनेने तो फेटाळून लावत राज्यात सविनय कायदेभंग आंदोलन सुरू केले. याअंतर्गत शेतकरी मोठ्या संख्येने प्रतिबंधित तणरोधक कापूस बियाण्याची पेरणी करीत आहेत. राज्यात ४२.८६ लाख हेक्टरवर कापूस लागवड होते. २०२० मध्ये त्यापैकी ११ ते १३ लाख हेक्टरवर एचटीबीटी लागवड झाली होती. १० वर्षांपासून राज्यात एचटीबीटी लावली जात आहे. कृषी विभागाने अलीकडे सुमारे २.५ काेटींचे एचटीबीटी बियाणे जप्त केले.

... म्हणून शेतकरी लावत आहेत एचटीबीटी बियाणे
बहाळेंच्या दाव्यानुसार, तण उपद्रव कमी केल्याने सरासरी २०% जास्त उत्पन्न मिळते. या पिकांमध्ये आपण तणनाशकाची डायरेक्ट फवारणी करू शकत असल्यामुळे खुरपणी व निंदणीची एकरी १२ ते १५ हजार रुपयांची थेट बचत होते. कापूस पिकांद्वारे पोषक आणि खतांचा कार्यक्षम वापर वाढवण्यात येत असल्याने शेतीचा खर्च कमी होतो. मातीत ओलावा टिकवून ठेवण्यासाठी तणनाशकांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. अशा प्रकारे पावसाचे पाणी जमिनीमध्ये मुरण्याची सोय करणाऱ्या शेतकऱ्यांना चांगली मदत होते.

बातम्या आणखी आहेत...