आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानागपूर विभागातील सहाही जिल्ह्यातील 62 तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे 5 लाख 25 हजार 759 शेतकऱ्यांच्या 4 लाख 77 हजार 064 हेक्टर क्षेत्रांवरील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये कापूस, सोयाबीन, तूर यासह इतर खरीप पिकांचा समावेश आहे. तसेच 5 हजार 435 हेक्टर शेतजमीन खरडून गेल्याची माहिती प्रभारी विभागीय आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिली.
पिकांची मोठ्या प्रमाणात हानी
चंद्रपूर, वर्धा आणि गडचिरोली या तीन जिल्ह्यातील पिकांची तुलनेने मोठ्या प्रमाणात हानी झाली असल्याचे विभागीय आयुक्तांनी सांगितले. तसेच या काळात 73 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. 186 पाणीपुरवठा योजना, रस्ते, आरोग्य सुविधा आदींचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. पायाभूत सुविधा व शेतकऱ्यांना दुबार पेरणी, खरडून गेलेल्या जमिनीच्या नुकसानीसाठी केंद्राने तत्काळ मदत करावी, अशी मागणी प्रधान सचिव असीम गुप्ता यांनी केली.
केंद्रीय पथकाने विभागातील विविध गावांना प्रत्यक्ष भेटी देऊन या नुकसानीसंदर्भात पाहणी केली. या पथकामध्ये नॅशनल इंटेलिजन्स ग्रीडचे सहसचिव राजीव शर्मा, जलशक्ती विभागातील संचालक हरीश उंबरजे, ऊर्जा मंत्रालयाच्या संचालिका मीना हुडा, ग्रामविकास विभागातील संचालक माणिक चंद्र पंडित, वित्त विभागातील उपसचिव रूपकदास तालुकदार, कृषी, सहकार व शेतकरी कल्याण विभागातील संचालक ए. एल. वाघमारे, रस्ते वाहतूक व महामार्ग विभागातील देवेंद्र चापेकर यांचा समावेश होता. मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम कुमार गुप्ता यांनीही दूरदृश्य प्रणालीद्वारे यावेळी केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांशी संवाद साधला.
पुरामुळे केले नुकसानीचे पंचनामे
नागपूर विभागात जुलै महिन्यात सरासरी 360.10 मिलिमीटर पाऊस पडतो. यावर्षी प्रत्यक्षात 684.22 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सरासरीपेक्षा 190 टक्के अधिक पाऊस झाल्यामुळे नदी काठावरील गावांना पुराचा धोका निर्माण झाल्याने अशा गावांतील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले होते. राज्य शासनाने पूरग्रस्तांना तातडीची मदत दिली असून अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहेत. त्यानुसार शासनाला अहवाल सादर करण्यात येत असल्याचे विभागीय आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.