आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताडोबात वाघाच्या चार बछड्यांचा मृत्यू:नर वाघाने ठार मारल्याचा प्राथमिक अंदाज; दोन दिवसांतील दुसरी घटना

नागपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील शिवनी वनपरिक्षेत्रात वाघाचे चार बछडे मृतावस्थेत आढळून आल्याने वन खात्यात खळबळ उडाली आहे. यापूर्वी 1 डिसेंबर रोजी ताडोबा बफर झोनमध्ये एक वाघीण व एक मादी शावक मृतावस्थेत मिळाले होते. त्यानंतर दोन दिवसातील ही दुसरी घटना आहे.

या मादी बछड्याचा मृत्यू इतर नर वाघाच्या हल्ल्यात झाल्याचे शरीरावरील खुणा तसेच घटनास्थळावरील परिस्थितीवरून दिसून आले होते. या चारही बछड्यांना नर वाघाने ठार मारल्याचा प्राथमिक अंदाज फिल्ड डायरेक्टर जितेंद्र रामगावकर यांनी व्यक्त केला आहे.

वनविभागाने दिलेल्या माहिती नुसार गुरूवार 1 डिसेंबर रोजी कंपार्टमेंट क्रमांक 265 मध्ये 3-4 महिने वयाची चार वाघांची पिल्ले दिसली. 30 नोव्हेंबर रोजी टी-75 या वाघीणीचा कुजलेला मृतदेह याच परिसरात आढळला होता. तेव्हापासून आरएफओ शिवनी पीआरटी सदस्यांसह कर्मचारी शोध पथक या बछड्यांवर लक्ष ठेवून होते. शुक्रवार 2 डिसेंबर 2022 रोजी त्याच परिसरात एक नर वाघ आढळून आला होता. शनिवार 3 रोजी शोधा दरम्यान शोध पथकाला वाघाच्या चारही पिल्लांचे (2 नर आणि 2 मादी) मृतदेह आढळून आले. आणि परिसरामध्ये नर वाघाचे अस्तित्व दिसून आले.

चारही मृतदेह चाव्याच्या जखमांसह सापडले आहेत. आणि ते नर वाघाने मारले असल्याचे उघड आहे. त्याच परिसरात 2 नर आणि एका दुसऱ्या मादीची उपस्थिती असल्याने आईची ओळख पटलेली नाही. सर्व बछड्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर चंद्रपूर येथे नेण्यात येत आहे. सर्व बछडे आणि मृत वाघिणीच्या ऊतींचे नमुने डीएनए ओळख पद्धतीद्वारे विश्लेषित केले जातील. आणि आई आणि बछड्यांच्या ओळखीची पुष्टी केली जाईल. कॅमेरा ट्रॅप्स लावून आणि क्षेत्रीय कर्मचारी तैनात करून परागंदा वाघांच्या उपस्थितीसाठी आणि हालचालीसाठी परिसरात आणखी सखोल निरीक्षण सुरू ठेवण्यात येईल असे रामगावकर यांनी सांगितले.

दुसऱ्या घटनेत ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बफर क्षेत्रातील शिवणी वनपरिक्षेत्रात गुरूवारी एक वाघीण मृतावस्थेत आढळली. मृत वाघीण अंदाजे 14 ते 15 वर्षांची होती. तिचे अवयव व कातडी कुजलेली आढळून आली. ही वाघीण टी - 75 म्हणून ओळखली जात होती.

बातम्या आणखी आहेत...